दहशतवादी संघटना आयसिसने ठार केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग आज इराकला रवाना झाले आहेत. व्ही के सिंग यांना मृतदेह भारतात आणण्यासाठी इराकमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मृतांपैकी एका भारतीयाचा डीएनए अद्याप जुळलेला नसल्याने त्याचा मृतदेह मिळण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे सध्या व्ही के सिंग ३८ जणांचेच मृतदेह घेऊन येणार आहेत. वायुसेनेच्या मदतीने मृतदेहांचे अवशेष आधी अमृतसर येथे कुटुंबियांना दिले जाताल, त्यानंतर पटना आणि कोलकाता येथे कुटुंबियांना अवशेष सोपवले जातील.


याआधी परराष्ट्र मंत्रालयाने एका आठवड्यात मृतदेह भारतात आणले जातील अशी माहिती संसदेत दिली होती. आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत बोलताना दिली होती. चार वर्षांपुर्वी मोसुलमधून या भारतीयांचं अपहरण झालं होतं. या भारतीयांमध्ये मजुरांची संख्या जास्त होती. 2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचं अपहरण केलं होतं. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केलं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मृतांमधील ३१ जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत.