संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित चिमुरडीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांनी आवाज उठवला आहे. माणुसकीला कलंक लावणाऱ्या या घटनेबद्दल संपूर्ण देशामध्ये संतापाची भावना आहे. माणूस म्हणून आम्ही अपयशी ठरलो आहोत. या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे असे टि्वट सिंह यांनी केले आहे.

माणूस आणि पशूमध्ये फरक आहे. पण कठुआमध्ये आठ वर्षाच्या मुलीबरोबर जे घडले ते पाहून माणूस म्हणजे शिवी वाटते. या प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे कि, जी पुढच्या अनेके पिढयांच्या लक्षात राहील असे सिंह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. व्ही.के.सिंह मोदी सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आहेत.

तिला न्याय मिळाला पाहिजे यासाठी बोलणारे व्ही.के.सिंह पहिले केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी जितेंद्र सिंह जे कठुआमधून खासदार आहेत त्यांनी मागच्या महिन्यात ज्यांनी काही चुकीचे केले नाही त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे म्हटले होते.

नेमके काय घडले
जम्मू- काश्मीरमधील बहुचर्चित कठुआ बलात्कार प्रकरणात पोलिसांनी सोमवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. आठ वर्षांच्या मुलीवर मंदिराच्या परिसरात बलात्कार करण्यात आला. बलात्कारापूर्वी एका नराधमाने धार्मिक विधी केला. तर या प्रकऱणातील आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने साथीदारांना मुलीची हत्येसाठी काही वेळ थांबा. मलाही तिच्यावर अत्याचार करायचे आहे, असे सांगितले होते, अशी माहिती या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या चिमुरडीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना १७ जानेवारी रोजी समोर आली होती. या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी आठव्या आरोपीविरोधातही आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रातून धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. निवृत्त सरकारी अधिकारी संजी राम हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. संजी रामनेच बलात्कार आणि हत्येचा कट रचला. संजी रामने त्याच्या पुतण्याला मुलीचे अपहरण करायला सांगितले. पीडित मुलगी नेहमीच जंगलात चारा घेण्यासाठी यायची. १० जानेवारीला पीडित मुलगी चारा शोधत असताना रामच्या अल्पवयीन पुतण्याने तिला गाठले.

त्याने पीडित मुलीला गप्पाच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले. यानंतर त्याने पीडितेला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचा साथीदार मन्नूनेही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर ते पीडित मुलीला एका मंदिराच्या आवारात घेऊन गेले. तेथील प्रार्थनाकक्षात पीडितेला डांबून ठेवण्यात आले. यानंतर त्या अल्पवयीन नराधमाने मेरठमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्रालाही फोन केला. लैंगिक भूक शमवण्यासाठी तातडीने काश्मीरला ये, असे त्याने सांगितले. यानंतर विशाल जंगोत्रा हा आरोपी देखील काश्मीरला पोहोचला. त्यांनी १२ जानेवारीला सकाळी मुलीला काही गोळ्या दिल्या आणि यामुळे ती बेशुद्ध झाली’, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

दुसरीकडे हिरानगर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. तक्रारी दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचे पालक तिचा शोधत मंदिरात पोहोचले. त्यांनी रामला मुलीबाबत विचारणा केली. ती एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल अशी शक्यता त्याने वर्तवली होती.
संजी रामने हिरानगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज या दोघांनाही या कटात सामील करुन घेतले होते. या दोघांनीही संजी रामला नियमित गुंगीचे औषध देण्याचा सल्ला दिला. तसेच त्याच्याकडून दीड लाख रुपये देखील घेतले.