ब्रिक्सशिखर परिषदेच्या निमित्ताने अनौपचारिक भेट

येथील ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी यांची रशियातील सोशी येथे मे महिन्यात अनौपचारिक भेट झाली होती. दोन्ही नेते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर बैठकीत जूनमध्ये चीनमधील क्विंगडाव येथे भेटले होते.

पुतिन यांच्याशी विस्तृत व फलदायी चर्चा झाली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य आहे व ते यापुढेही सुरू राहील असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, पर्यटन यातील मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. मोदी-पुतिन यांच्यात मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. मे महिन्यात सोशी येथील चर्चेत विशेष  धोरणात्मक भागीदारीवर चर्चा  झाली होती. मोदी यांचे बुधवारी दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी येथे आगमन झाले. ब्रिक्स इन आफ्रिका हा या वेळच्या बैठकीचा मध्यवर्ती विषय आहे. ब्रिक्स संघटनेची स्थापना २००९ मध्ये झाली असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यात जगातील चाळीस टक्के लोकांचा समावेश होतो.

अंगोला व अर्जेंटिनाच्या नेत्यांशी चर्चा

मोदी यांनी ऊर्जा व कृषी क्षेत्राच्या संदर्भात संबंध वाढवण्यासाठी अंगोला व अर्जेंटिनाच्या अध्यक्षांशीही द्विपक्षीय चर्चा के ली. अंगोलाचे अध्यक्ष जोआव लॉरेन्को यांच्याबरोबरचे मोदी यांचे छायाचित्र ट्विटरवर टाकण्यात आले आहे. अंगोलाच्या स्वातंत्र्यलढय़ास भारताने पाठिंबा दिला होता. त्यानंतर १९७५ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून तो देश मुक्त झाला. अंगोलाबरोबरचा भारताचा  व्यापार हा १५ टक्के आहे. नायजेरियानंतर या देशाकडून भारत अंगोलातून खनिज तेल घेतो. तेथे भारतीय वंशाचे ४ हजार लोक आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसिओ मॅक्री यांच्याशी मोदी यांनी कृषी, औषधे व गुंतवणूक या मुद्दय़ांवर चर्चा केली.