वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणात काम करणाऱ्या अमेरिकी अधिकाऱ्यांनी हवे असल्यास आमच्या देशातील अधिकारी करीत असलेल्या चौकशीत सामील व्हावे, असा प्रस्ताव अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हेलसिंकी येथील शिखर बैठकीत मांडल्याचे सांगण्यात आले.

२०१६च्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत रशियाच्या  बारा गुप्तचर अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप असून त्या बाबत अमेरिकेत चौकशी सुरू आहे.

पुतिन यांच्याशी भेटीनंतर पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले, की पुतिन यांनी या आरोपांबाबत अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत चौकशी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. कुणाचा विश्वास बसणार नाही, पण हा प्रस्ताव पुतिन यांनी मांडला आहे. ट्रम्प यांची प्रचार समिती व क्रेमलिन यांच्या संबंधाचा आरोप अमेरिकेच्या विशेष वकिलांनी केला असून, या कारस्थानात रशियाचे लष्क री गुप्तचर अधिकारी सामील होते असे सांगण्यात आले.

डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी व हिलरी क्लिंटन यांची प्रचार यंत्रणा यांच्या माहितीचे रशियन अधिकाऱ्यांनी हॅकिंग केले होते व ऑनलाइन संदेश चोरले होते.

पुतिन यांनी मांडलेल्या प्रस्तावावर ट्रम्प यांनी जास्त काहीच सांगितले नाही. पुतिन यांनी असे स्पष्ट केले, की अमेरिकेचे विशेष वकील रॉबर्ट म्युलर हे रशियन कायदा संस्थांना संशयितांचे जाबजबाब घेण्यास सांगू शकतात. त्या जाबजबाबावेळी १९९९च्या कायदेशीर साहाय्य करारानुसार अमेरिकेच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे त्या बदल्यात रशियात गुंतवणूक करणारा ब्रिटिश गुंतवणूकदार बिल ब्रोडर याच्या आर्थिक गुन्हय़ांच्या चौकशीत अमेरिकेने मदत करावी.

कारण ब्रोडर याच्यामुळेच रशियन अधिकाऱ्यांना मानवी हक्कात लक्ष्य बनवणारा कायदा करण्यात आला आहे. अमेरिका पुतिन यांचा हा प्रस्ताव गांभीर्याने घेण्याची शक्यता दिसत नाही, कारण अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी या प्रस्तावाची उघडपणे कुचेष्टा केली आहे.