रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंळवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे. या नवीन कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीविरोधात कोणत्याच प्रकारचा कायदेशीर खटला दाखल करता येणार नाही. म्हणजेच एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर खटल्यांपासून मरेपर्यंत संरक्षण मिळणार आहे. या कायद्यासंदर्भातील माहिती मंगळवारी ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली. या कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या कालावमध्ये केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यात आलं आहे. या व्यक्तींविरोधात या नवीन कायद्यानुसार कोणताही न्यायालयीन खटला चालवता येणार नाही. केवल खटल्यापासून मुक्ती नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा हक्क पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना असणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नव्याने अंमलात आणलेला हा कायदा यंदाच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये रशियातील संसदेने संमत केलेल्या काद्यांपैकी एख आहे. याच वर्षी संविधानामध्ये बदल करुन ६८ वर्षीय पुतीन हे पुढील १६ वर्षे म्हणजेच सन २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी कायम राहतील अशी तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये संविधानातील या बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये ७७ टक्के लोकांनी घटना दुरुस्तीच्या बाजूनं मतदान केलं.  विशेष म्हणजे नुकताच लागू झालेला हा कायदा अंमलात येण्याआधीपासूनच राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तींना या पदावर असताना केलेल्या गुन्ह्यांमधून संरक्षण देण्याची तरतूद रशियन कायद्यांमध्ये आहे. आता केवळ देशद्रोह किंवा इतर गंभीर प्रकरणांमधील आरोप आणि सर्वोच्च न्यायालयांमधील खटल्यांमध्ये करण्यात आलेल्या आरोपांमध्ये संबंधित माजी राष्ट्राध्यक्ष दोषी आढळल्यास त्यांना मिळालेलं हे संरक्षण काढून घेण्यात येऊ शकतं. मात्र ही प्रक्रियाही अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची असून हा कायदा म्हणजे राष्ट्राध्यक्षांसाठी मोकळीक दिल्यासारखाच प्रकार असल्याचे जाणाकार सांगतात. पुतीन यांनी तातडीने हा कायदा लागू केल्याने ते पद सोडतील अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. मात्र पुतीन यांच्या नीटकवर्तीयांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

पुतीन यांची पकड मजबूत होत गेली

शुद्धीपेक्षा मद्यधुंदतेतच अधिकाधिक काळ घालवणारे बोरीस येल्तसिन यांच्याकडून नवे सहस्रक उंबरठय़ावर असताना १९९९ साली पुतिन यांनी सत्ता घेतली. त्याआधी पुतीन रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. पुतिन यांनी सत्ता मिळाल्यानंतर बोरीस यांना हात न लावता आपल्या अन्य स्पर्धकांना त्यांनी एकामागून एक संपवले. म्हणजे शब्दश: गायब केले. येल्तसिन यांच्यासाठी त्यांना काही फार करावे लागले नाही. ते २००७ साली गेलेच. पण त्यानंतर मात्र पुतिन यांनी आपली सगळी ताकद रशियास अभेद्य अशा मुठीत घेता येईल यासाठीच खर्च केली. त्यासाठी प्रसंगी बनावट दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. या हल्ल्यांमुळे सामान्य रशियनांच्या मनात राष्ट्रवादाची लाट आली आणि या देशप्रेमाच्या भरतीत पुतिन यांचे उरलेसुरले विरोधक नाकातोंडात पाणी जाऊन कायमचे निकालात निघाले. मग पुतिन यांनी यथावकाश अध्यक्षपदही मिळवले आणि आपली पकड घट्ट केली.