भारतीय दूरसंचार बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची व्होडाफोन आणि तिसऱ्या क्रमांकाची आयडिया सेल्युलर लिमिटेड लवकरच एकत्र येण्याची शक्यता आहे. सध्या रिलायन्स जिओ वेगाने वाटचाल करत असल्याने व्होडाफोन आणि आयडिया हातमिळवणी करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कंपन्यांच्याकडून याबद्दलची बोलणी सुरू आहे.

बाजारातील आपला नफा वाचवण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया एकत्र येण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओकडून सध्या ग्राहकांना मोफत इंटरनेट आणि व्हॉईस कॉल्स सेवा दिली जात आहे. रिलायन्स जिओच्या या मोफत सेवेला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आणि आयडिया एकत्र येऊ शकतात.

याआधी व्होडाफोनने आयपीओ आणण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र बाजारात जिओचे आगमन झाल्यामुळे व्होडाफोनने योजनेला स्थगिती दिली. जिओला रोखण्यासोबतच भारती एअरटेलला शह देण्याच्या उद्देशानेदेखील व्होडाफोन आणि आयडिया एकत्र येत आहेत. सध्या एअरटेलचे देशभरात २७ कोटी ग्राहक आहेत. तर रिलायन्स जिओने ७ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. व्होडाफोन आणि आयडिया यांची एकत्रित ग्राहक संख्या ३७ कोटी इतकी आहे. त्यामुळे रिलायन्स जिओला अव्वल स्थान पटकावणे अवघड होऊ शकते. यासोबतच एअरटेलसाठीही मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते.

आयडियासोबत हातमिळवणी करणे व्होडाफोनसाठी चांगला पर्याय असल्याचे सीएलएसएचा अहवाल सांगतो. व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्यास दोन्ही कंपन्यांच्या सेवेचा दर्जा आणखी सुधारणार आहे. यासोबतच रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देणेदेखील शक्य होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने ४जी इंटरसेवा वापरणाऱ्या ग्राहकांना चौपट डेटा देण्याची घोषणा केली होती. मात्र या इंटरसेवेचे दर प्रत्येक भागात वेगवेगळे असणार आहेत. व्होडाफोनच्या नव्या ऑफरनुसार, १५० रुपयांमध्ये १ जीबी इंटरनेट, २५० रुपयांमध्ये ४ जीबी इंटरनेट आणि १,५०० रुपयांमध्ये ३५ जीबी इंटरनेट देण्यात येणार आहे.