दूरसंचार कंपन्यांमधील डेटा युद्ध तीव्र होताना दिसते आहे. रिलायन्स जिओकडून प्राईम ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑफरला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने नवी ऑफर जाहीर केली आहे. रिलायन्स जिओने प्राईम ग्राहकांना ३०३ रुपयांमध्ये अमर्यादित कॉल्स, एसएमएस, दर दिवशी १ जीबी ४ जी डेटा अशा सेवा दिल्या आहेत. आता व्होडाफोनने याच सर्व सेवा ३४६ रुपयांमध्ये ग्राहकांसाठी आणल्या आहेत. या नव्या ऑफरची घोषणा व्होडाफोनकडून करण्यात आली आहे.

जिओने ३०३ रुपयांमध्ये अमर्यादित कॉल्स, एसएमएस, दर दिवशी १ जीबी ४ जी डेटा ही नवी ऑफर फक्त प्राईम वापरकर्त्यांसाठीच आणली आहे. मात्र यामध्ये व्होडाफोनने रिलायन्स जिओवर कुरघोडी केली आहे. व्होडाफोनने त्यांची नवी ऑफर मर्यादित ग्राहकांसाठी न आणता सर्वच ग्राहकांसाठी खुली ठेवली आहे.

रिलायन्स जिओमुळे सर्वच कंपन्यांमध्ये स्वस्त दरात इंटरनेट सेवा देण्याची स्पर्धा तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओकडून सुरुवातीला इंटरनेट सेवेसह कॉलिंग मोफत देण्यात आले होते. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांना मोठा फटका बसला. रिलायन्स जिओने मोफत इंटरनेट सेवा पुरवल्याने व्होडाफोन आणि एअरटेलला डेटा प्लान्सच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घट करावी लागली.

रिलायन्स जिओने सुरुवातीच्या काळात इंटरनेट सेवा मोफत दिली होती. मात्र आता रिलायन्स जिओकडून प्राईम वापरकर्त्यांसाठी नव्या ऑफर आणण्यात आल्या आहेत. प्राईम वापरकर्त्यांना ३०३ रुपयांमध्ये दिवसाकाठी १ जीबी ४जी डेटा महिनाभरासाठी वापरता येणार आहे. तर दिवसाकाठी २ जीबी ४जी डेटासाठी प्राईम ग्राहकांना दर महिन्यासाठी ४९९ रुपये मोजावे लागणार आहेत. जिओचे प्राईम ग्राहक होण्यासाठी ग्राहकांना ९९ रुपये मोजावे लागतील. जिओचे प्राईम ग्राहक होण्यासाठी ३१ मार्च २०१७ आधी सीम कार्ड विकत घेतलेले असणे आवश्यक आहे.

प्राईम ग्राहक नसलेल्यांना रिलायन्स जिओकडून दर महिन्याला २.५ जीबी ४जी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित मेसेजेसची सेवा देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना महिन्याला ३०३ रुपये मोजावे लागणार आहेत. रिलायन्स जिओ फक्त प्राईम ग्राहकांना ३०३ रुपयांमध्ये अमर्यादित कॉल्स, एसएमएस, महिनाभर दर दिवशी १ जीबी ४ जी डेटा देणार आहे. तर व्होडाफोनकडून सर्वच ग्राहकांना ३४६ रुपयांमध्ये अमर्यादित कॉल्स, एसएमएस, महिनाभर दर दिवशी १ जीबी ४ जी डेटा देण्यात येणार आहे.