देशातील दलित बंधू-भगिनींवर अत्याचार होत आहेत. कायद्याचा सन्मान करण्या ऐवजी, मुलींना सुरक्षा देण्या ऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

काँग्रेसचे नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रभारी यांना मार्गदर्श करतेवेळी सोनिया गांधी यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाची लोकशाही कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, देशातील लोकशाही सर्वात कठीण काळातून जात आहे. करोनाला हरवण्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांनी देशाला आहे त्या परिस्थितीवर सोडले आहे. त्यांनी आपल्या उत्तरदायीत्वापासून तोंड फिरवले आहे. महामारीशी लढण्यासाठी यांच्याकडे धोरणही नाही व विचार नाही.

देशासाठी सातत्याने संघर्ष करणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट राहिलेले आहे. देशाची सेवा करणे हाच आपल्या संघटनेचा मूलमंत्र आहे. असं देखील त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.

यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून देखील टीका केली. त्यांनी म्हटले की, ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत व यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याचबरोबर अर्थव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरून देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.