न्यूझीलंडमधील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या एका बेटावर ज्वालामुखीचा अचानक उद्रेक होऊन त्यामध्ये पाच जण ठार झाले, तर १८ जण जखमी झाले असून अनेक जण तेथे अडकून पडल्याचे वृत्त आहे.

जवळपास ५० पर्यटक व्हाइट आयलंडवर होते तेव्हा ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि हवेत राख आणि खडक फेकले गेले. यानंतर जवळपास २४ जणांनी तेथून आपली सुटका करून घेतली, तर पाच जण ठार झाले. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून काही जण गंभीर भाजले आहेत. अद्यापही काही जणांचा एक गट या बेटावर अडकून पडला आहे.

बेटावर निश्चित किती जण आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे उपायुक्त जॉन टिम्स यांनी सांगितले. रात्र झाल्यानंतर मदतकार्य अधिक धोकादायक होणार आहे.

बेटावर अस्थिर स्थिती आहे, आणखी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बेटावर जाणे शारीरिकदृष्टय़ा असुरक्षित आहे, असे ते म्हणाले. या आपत्तीमध्ये सापडलेल्यांपेकी बहुतेक जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत, असे कॅनबेरातील अधिकाऱ्यांनी सांगितले.