जर्मनीतील फोक्सवॅगनच्या या वाहन कंपनीच्या  कारखान्यात सोमवारी यंत्रमानवाकडून मानवी कर्मचाऱ्याची हत्या करण्याचा प्रकार घडला. येथील फ्रँकफुर्ट शहराच्या उत्तरेस १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोनाटल येथील फोक्सवॅगनच्या कारखान्यात ही घटना घडल्याची माहिती कंपनीचे प्रवक्ते हेईको हिलविग यांनी दिली. या घटनेच्यावेळी २२ वर्षांचा हा कर्मचारी स्टेशनरी यंत्रमानवाचे नियंत्रण करत होता. त्यावेळी या यंत्रमानवाने कर्मचाऱ्याला पकडले आणि त्याला जवळच्या लोखंडी पट्टीवर आपटून ठार मारले. परंतु, या घटनेत यंत्रमानवापेक्षा मानवी चूक जास्त प्रमाणात कारणीभूत असल्याचा दावा हिलविग यांनी केला आहे. हा यंत्रमानव कारखान्यातील विविध कामे करण्यासाठी तयार करण्यात आला होता. वाहनांचे सुटे भाग हाताळल्या जाणाऱ्या कारखान्याच्या विशिष्ट भागातच यंत्रमानवांना काम करण्याची मुभा असते. हा प्रकार घडला त्यावेळी घटनास्थळी आणखी एक कर्मचारी उपस्थित होता. मात्र, त्याला यंत्रमानवाने कोणतीही इजा पोहचवलेली नसल्याचे हेलविग यांनी सांगितले. दरम्यान, सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्यानंतरच उर्वरित माहिती देता येईल असे त्यांनी सांगितले.