अर्थव्यवस्थेला लागलेली घसरण, सरकारची अकार्यक्षमता आणि सरकारवर सातत्याने होत असणारे भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे मतदारांमध्ये केंद्र सरकारबद्दल प्रचंड नकारात्मक भावना निर्माण झाली असल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिली आहे. येथील ‘थिंकफेस्ट’ या कार्यक्रमात रविवारी बोलताना अर्थमंत्र्यांनी ही कबुली दिली.
‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत चिदम्बरम यांनी केंद्र सरकारच्या विद्यमान कामगिरीविषयी भाष्य केले. ते म्हणाले, ‘यूपीएच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या काळात मला मतदारांमध्ये नकारात्मक भावना दिसते आहे. मला ती दिसत नसेल तर मी आंधळा आहे, असेच म्हणावे लागेल. पण त्याची कारणे रोडावलेली आर्थिक वाढ, सरकारची अकार्यक्षमता, भ्रष्टाचाराचे आरोप, चलनवाढ व रोजगारनिर्मितीत आलेला संथपणा ही आहेत’. नकारात्मक परिस्थिती असली तरी केंद्र सरकार पुन्हा जनतेचा विश्वास कमावण्यात यशस्वी होईल असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला. कदाचित आम्ही त्यात यशस्वी होणार नाही मात्र लोक देतील तो निकाल आम्हाला मान्य असेल असेही चिदम्बरम म्हणाले.
गेल्या दहा वर्षांच्या अखेरच्या दोन वर्षांत आर्थिक वाढ कमी झाली. मी ती वर आणण्याचे प्रयत्न करीत आहे व माझ्या परीने प्रयत्न करीन. निवडणुकांपूर्वी पुन्हा वर उसळी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांमध्ये संवादकौशल्याचा अभाव
पंतप्रधान मनमोहन सिंग जाहीर सभा किंवा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अपेक्षेइतका संवाद साधत नाहीत असे सांगत अर्थमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान जनतेशी संवाद का साधत नाहीत, महत्त्वाच्या विषयांवरील मते ते उघडपणे व्यक्त का करत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना त्यांना नाराजी लपवता आली नाही.
मोदीच खरे आव्हानवीर
नरेंद्र मोदी यांचेच काँग्रेससमोर खरे आव्हान आहे, अशी कबुलीही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली. देशातील सर्वात प्रबळ विरोधी पक्षाचे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. त्यांची दखल घेणे भागच आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस पक्ष मोदींकडे कसा पाहतो ते स्पष्ट केले.