राज्यसभेच्या ५८ जागांसाठी १६ राज्यांमध्ये आज निवडणूक होणार आहे. ५८ जागांपैकी ३३ जागा बिनविरोध निवडूल आल्या आहेत, त्यामुळे आज २५ जागांसाठी मतदान होणार आहे. १६ राज्यांपैकी १० राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली आहे. मतदान सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार असून दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत निकाल घोषित होण्याची अपेक्षा आहे.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होती. ती बिनविरोध झाली आहे. महाराष्ट्रात भाजपाकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, देहरादून आणि ओदिशा या १० राज्यांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली असल्या कारणाने तिथे आज मतदान होणार नाही.

या निवडणुकीत भाजपा जास्तीत जास्त जागा जिंकत सभागृहातील सर्वात मोठा पक्ष राहण्याचा प्रयत्न करेल. मात्र या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे उत्तर प्रदेशाकडे.

उत्तर प्रदेशात १० जागांसाठी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात अनेक राजकीय डावपेच पहायला मिळू शकतात. एकीकडे भाजपाने आपला नववा उमेदवार जिंकवण्यासाठी विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. बसपा आमदार अनिल सिंह भाजपा कॅम्पमध्ये दिसले होते. तर दुसरीकडे समजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव बसपा उमेदवार भीमराव आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवत युती यशस्वी करु पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दगाफटका झाला तर जया बच्चन यांच्या जागी भीमराव आंबेडरांना विजय मिळवून देण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया बच्चन राज्यसभेवर गेल्या नाहीत तर पक्षाला फारसा फरक पडणार नाहीये. पण भविष्यात भाजपाचा सामना करायचा असेल तर युती होण्यासाठी असणा-या सर्व शक्यतांचा विचार केला पाहिजे.