छत्तीसगढमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होत आहे. या टप्प्यामध्ये राज्यातील विद्यमान ९ मंत्र्यांसह १०७९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत कैद होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १,५३,८५,९८३ मतदार १०७९ उमेदवारांसाठी मतदान करणार आहेत. यामध्ये ११९ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.

राज्यातील रायपूरनगर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४६ उमेदवार आणि बिंद्रानवागढमध्ये सर्वाधिक कमी ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात येथे १८ जागांसाठी मतदान झाले होते. राज्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी निमलष्करी दल आणि पोलिसांचे सुमारे १ लाख जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्यातील गरियाबंद, धमतरी, महासमुंद, कबीरधाम, जशपूर आणि बलरामपूर जिल्ह्यातील काही भाग नक्षलप्रभावित आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी ७२ जागांवर सकाळी ८ वाजपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल.

छत्तीसगढमधील या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान, कसडोल जागेवरुन विधानसभा अध्यक्ष गौरीशंकर अग्रवाल आणि मंत्रीमंडळाचे ९ सदस्य यांमध्ये रायपूर दक्षिण मतदारसंघातून ब्रृजमोहन अग्रवाल, रायपूर पश्चिममधून राजेश मूणत, भिलाईतून प्रेम प्रकाश पांडेय, बैकुंठपूरतून भैयालाल राजवाडे, मुंगेलीतून पुन्नूलाल मोहिले, प्रतापूरमधून रामसेवक पैकरा, बलासपूरमधून अमर अग्रवाल, कुरुदमधून अजय चंद्राकर आणि नवागढमधून दयालदास बघेल यांचा समावेश आहे. तसेच अंबिकापूरमधून विधानसभेचे विरोधीपक्षनेते टीएस हिंसदेव, पाटनमधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल, सक्तीतून काँग्रेस उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री चरणदास महंत, दुर्ग ग्रामीणमधून खासदार ताम्रध्वज साहू, मरवाहीतून माजी मुख्यमंत्री अजीत जोगी आणि कोटातून त्यांच्या पत्नी रेणू जोगी यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

२०१३मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७२ जागांपैकी ४३ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसने २७ आणि बहुजन समाज पार्टीने १ जागेवर विजय मिळवला होता. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला होता.