25 September 2020

News Flash

‘अगुस्तावेस्टलँड’ प्रकरणात इटलीत दोन माजी अधिकाऱ्यांना तुरूंगवास

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्स खरेदीच्या भ्रष्टाचारात इटलीतील संरक्षण सामग्री

| April 9, 2016 01:45 am

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्स खरेदीच्या भ्रष्टाचारात इटलीतील संरक्षण सामग्री उत्पादन कंपनी फिनमेकॅनिकाचे माजी प्रमुख गिसेपी ओर्सी यांना मिलान येथील अपीलीय न्यायालयाने साडेचार वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यावर बारा हेलिकॉप्टरच्या विक्रीत चुकीचे हिशेब व भ्रष्टाचाराचा आरोप होता.
या निकालात २०१४ मधील न्यायालयाचा आदेश बदलण्यात आला असून पूर्वीच्या या निकालात ओर्सी यांना भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ात दोषमुक्त ठरवले होते. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टावेस्टलँड कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांना चार वर्षे कारावासाची शिक्षा काल न्यायालयाने दिली आहे. भारत सरकारला १२ हेलिकॉप्टर्सची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या या अधिकाऱ्यांना जास्त शिक्षेची मागणी अभियोक्तयांनी केली होती. ओर्सी यांना सहा वर्षे, तर स्पॅगनोलिनी यांना पाच वर्षे तुरूंगवासाची मागणी करण्यात आली होती. फिनमेकॅनिका कंपनीला हा दणका असून त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न चालवला असतानाच आता ती प्रतिमा डागाळली आहे. फिनमेकॅनिका कंपनीने या निकालावर काही सांगण्यास नकार दिला. कंपनीत आता बरेच बदल झाले असून फिनमेकॅनिका ही आता पूर्ण वेगळी कंपनी आहे. व्यवस्थापन व संघटनात्मक पातळीवर बदल झाले आहेत असे सांगण्यात आले. दोन्ही आरोपींच्या वकिलांनी शिक्षेवर अपील करण्याचे ठरवले आहे. भारतात या प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय व सीबीआय करीत आहे. या प्रकरणात माजी हवाई दल प्रमुख एस.पी.त्यागी व त्यांच्या नातेवाइकांना दलाली मिळाल्याचा आरोप आहे. सक्तवसुली संचालनालयाने त्यागी, त्यांचे कुटुंबीय, युरोपीय नागरिक- कालरे गेरोसा, ख्रिस्तीयन मिशेल, गिडो हाश्के व फिनमेकॅनिका, अगुस्तावेस्टलँड व चंडीगडटी आयडीएस इन्फोटेक, एरोमॅट्रिक्स, मॉरिशस व टय़ुनिशियातील दोन कंपन्या व आणखी दोन जण अशा सगळ्यांविरोधात सीबीआयने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:45 am

Web Title: vvip chopper scam finmeccanicas ex boss jailed for corruption
Next Stories
1 बाहेरील विद्यार्थ्यांच्या मागण्यांना स्थानिकांचा तीव्र विरोध
2 अर्जेटिनाच्या अध्यक्षांची पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी
3 अमेरिकेतील भारतीय वंशाच्या गटाचा ट्रम्प यांना पाठिंबा
Just Now!
X