चौकशी अहवालात दाव्याला दुजोरा

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगणाऱ्या अण्णाद्रमुकच्या काढून टाकण्यात आलेल्या नेत्या व्ही.के. शशिकला यांना येथील कारागृहात विशेष वागणूक देण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे.

बंगळूरु येथील परप्पाना अग्रहारा तुरुंगात शशिकला यांना प्राधान्याची वागणूक देण्यात आली आणि त्यांच्यासाठी एक वेगळे स्वयंपाकघर होते, असा दावा तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृह) डी. रुपा यांनी जुलै २०१७ मध्ये केला होता. या आरोपांची चौकशी करणारे आयएएस अधिकारी विनय कुमार यांनी त्यांच्या अहवालात या आरोपाला दुजोरा दिला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते नरसिंह मूर्ती यांनी सांगितले. माहितीच्या अधिकाराखाली मी हा २९५ पानांचा अहवाल वाचला आहे. शशिकला यांना तुरुंगात खास वागणूक देण्यात आल्याची त्यात पुष्टी करण्यात आली आहे, असे मूर्ती यांनी पीटीआयला सांगितले.