मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यातील संशय अधिकच व्यापक होत चालला असून शनिवारी या प्रकरणी वार्ताकन करण्यास गेलेल्या एका वाहिनीच्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला होता तर रविवारी जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलात सापडला आहे. त्यांचाही मृत्यू हा संशयास्पद मानला जात असून डॉ. शर्मा यांनी व्यापम घोटाळ्यातील अनेक गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला होता.
जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण शर्मा यांचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये सापडला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, पत्रकार अक्षय सिंग यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष तपास पथकाला पत्र लिहिणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. तसेच सिंग याच्या व्हिसेराची तपासणी ‘एआयआयएमएस’मध्ये करण्याची त्याच्या कुटुंबियांची मागणी चौहान यांनी मान्य केली आहे.
व्यापम घोटाळ्यावर केंद्र सरकारने पहिल्यांदाच मौन सोडले असून पत्रकार अक्षय सिंग याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यात यावी, असे मत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले आहे. जेटली यांनी ट्विपण्णी करत ही दुख:द घटना असून सिंग याच्या कुटुंबियांच्या दुख:त सहभागी असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.