आयपीएल स्पर्धेत झालेल्या कथित गैरव्यवहारातील संशयित ललित मोदी यांना भाजप नेत्यांनी केलेल्या मदतीचा वाद शमण्यापूर्वीच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यामुळे भाजपसमोरील संकट गडद झाले आहे. व्यापमं प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार अक्षय सिंह यांची हत्या व चौकशी समितीचे सदस्य डॉ. अरूण शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर काँग्रेस व आम आदमी पक्षाने भाजपवर शरसंधान केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून व्यापमं घोटाळ्याच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक नेमण्याची मागणी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनी केली.
पत्रकार अक्षय सिंह यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस व्यापमंवरून भाजपला सोडणार नसल्याचे स्प्लाहाष्ट संकेत मिळत आहेत.
व्यापमं प्रकरणाशी संबधित २४ जणांची हत्या झाल्याचा दावा राज्य भाजप नेते करीत आहेत. तर प्रत्यक्षात ही संख्या ४६ असल्याचा दावा सुर्जेवाला यांनी केला. मध्य प्रदेश काँग्रेसने व्यापमं प्रकरणाशी संबधित हत्या झालेल्या ४६ जणांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. व्यापमं प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले तरीही विरोधकांचे समाधान होणे शक्य नाही. काँग्रेसने दररोज भाजपविरोधात पत्रकारपरिषदांचा सपाटा लावला आहे. ज्यात कधी ललित मोदी तर कधी व्यापमं घोटाळ्यावरून केंद्र सरकारवर आरोप केले जातात. आता तर दोन जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. मोदींनी नैतिक जबादारी स्वीकारून व्यापमंच्या सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, असे सुर्जेवाला म्हणाले. काँग्रेस आक्रमक झाल्याने कोणत्याही परिस्थितीत पावसाळी अधिवेशनात भाजपची वाट सोपी राहणार नाही. सभागृहाचे कामकाज बंद पाडून सरकारवर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आणण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे.

२१ जुलैपासून अधिवेशन
येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारला सळो की पळो करून सोडण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. गेल्या महिनाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधी गटाचे मानले जाणाऱ्या नेत्यांचीच प्रकरणे बाहेर येत असल्याने पक्षातील एका गटात आनंदाचे वातावरण आहे. तर भाजप नेत्यांवर होणाऱ्या आरोपांचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर होणार नाही यासाठी रणनिती आखण्यात येत आहे. ज्यात प्रामुख्याने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचा पुढाकार आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अरूण शर्मा यांच्या संशयास्पद मृत्यूमागे व्यापमं घोटाळ्यातील आरोपी असल्याचा दावा केला. शिवराज सिंह यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी आक्रमक टीका दिग्विजय सिंह यांनी केली.