मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापम) घोटाळय़ात जागल्याची भूमिका पार पाडणारे प्रशांत पांडे यांच्या पत्नीला पोलिसांनी काही काळ स्थानबद्ध केले. त्यांच्याकडून हवाला मार्गाने आलेले ९.९६ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांवर टीका करताना प्रशांत पांडे यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या सांगण्यावरून आपल्या कुटुंबाचा छळ केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापम घोटाळय़ाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. पोलीस अधीक्षक ओ. पी. त्रिपाठी यांनी सांगितले, की जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे असलेल्या लक्ष्मी मोटर्सच्या हवाला व्यवहारांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले होते, तेव्हा काल प्रशांत यांच्या पत्नी मेघना पांडे या त्यांच्या आस्थापनेच्या कार्यालयातून बॅग घेऊन बाहेर येताना दिसल्या. त्या या कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापक आहेत.
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत ९.९६ लाख रुपये सापडले. ते पैसे कुठून आले याचे स्पष्टीकरण त्यांना देता आले नाही, त्यामुळे कलम १०२ अन्वये पैसे जप्त करण्यात आले. नंतर मेघना यांना सोडून देण्यात आले. पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला माहिती दिली असून चौकशी करण्यास सांगितले.

‘जप्त रक्कम कष्टाची कमाई’
प्रशांत पांडे यांनी सांगितले, की पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदा असून, जप्त केलेले पैसे आमची कष्टाची कमाई होती. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा छळ सुरू केला आहे. दहा वर्षे मेहनत करून आम्ही पैसा मिळवला आणि प्राप्तिकर विवरणपत्रेही भरलेली आहेत. आम्ही भाडय़ाच्या सदनिकेत राहतो आणि नवीन सदनिका नोंदवण्यासाठी आपली पत्नी दहा लाख रुपये घेऊन येत होती. पांडे यांनी व्यापम घोटाळय़ाची अनेक कागदपत्रे सादर केली आहेत.