मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळातील म्हणजे व्यापम घोटाळ्यात सामील असलेले माजी मंत्री व भाजप नेते विक्रम वर्मा यांच्याविरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणात जागल्याची भूमिका पार पाडणारे सरकारी डॉक्टर आनंद राय यांची इंदूर येथून धार जिल्ह्य़ात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी या बदलीला न्यायालयात आव्हान देण्याचे ठरवले आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी दोन हजार आरोपींना अटक केली असून ५५ गुन्हे दाखल केले होते.
या प्रकरणात ४९ व्यक्तींचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. वर्मा यांनी प्रभाव व अधिकार वापरून गाझियाबादमधील संतोष मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएसला शिकत असलेल्या मुलीची भोपाळच्या गांधी वैद्यकीय महाविद्यालयात बदली करून घेतली होती. त्याबाबत राय यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. इंदूर येथे आरोग्य खात्याच्या प्रशिक्षण संस्थेच्या प्रतिनियुक्तीवर असलेले राय यांची काल बदली करण्यात आली. त्यांच्या पत्नी गौरी या सरकारी डॉक्टर असून त्यांचीही बदली करण्यात आली आहे. वर्मा यांच्याविरोधात १७ जुलैला तक्रार दिल्यानंतर आपल्यावर सूड उगवला जात असून चुकीची कृत्ये करणारे लोकच राज्य चालवत आहेत, असा आरोप राय यांनी केला. व्यापम घोटाळा उघड करण्यात आणखी दोघांचा वाटा असून त्यापैकी आशिष चतुर्वेदी यांनी सांगितले, की आपण व आपले सहकारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राय व त्यांच्या पत्नीची बदली रद्द करण्याची मागणी करणार आहोत, सरकारने तसे केले नाही तर आम्ही निषेध करणार आहोत.

प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित होईपर्यंत राज्याच्या
तपास संस्थांना आरोपपत्र दाखल करण्यास मुभा
नवी दिल्ली- मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित होईपर्यंत या प्रकरणांबाबत आरोपपत्र दाखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मध्य प्रदेश पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) आणि विशेष कृती दल (एसटीएफ) यांना परवानगी दिली.
राज्य सरकारच्या तपास संस्थांना या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी द्यावी, या सीबीआयने केलेल्या अर्जावर हा अंतरिम निर्णय देऊन न्या. एच. एल. दत्तू, न्या. न्या. अरुण कुमार मिश्रा व न्या. अमितावा रॉय यांच्या खंडपीठाने या अर्जावरील सुनावणी २४ जुलै रोजी ठेवली.
काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्यावतीने काम पाहणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सीबीआयच्या या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. ही विनंती मान्य करून न्यायालयाने सुनावणीसाठी २४ तारीख निश्चित केली.व्यापम घोटाळ्यातील १८५ हून अधिक प्रकरणे एसआयटीकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास वेळ लागणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभेचे कामकाज तहकूब
भोपाळ- व्यापम घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच विरोधी सदस्यांनी या घोटाळ्यात संशयास्पद मृत्यू झालेले दूरचित्रवाणी पत्रकार अक्षय सिंह, एमबीबीएस विद्यार्थिनी नम्रता दामोर आदींना श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला असता कामकाज तहकूब करण्यात आले. मध्य प्रदेश विधानसभेचे बारा दिवसांचे अधिवेशन आज सुरू झाले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्ष सीताशरण शर्मा यांनी भाजपचे नवनिर्वाचित आमदार चंदर सिंह सिसोदिया यांना शपथ दिली. त्यानंतर सभापतींनी माजी सदस्य व प्रसिद्ध व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. त्यात दिलीप सिंह भुरिया, शीला कौल, बुफरान ए आझम, चार्ल्स कोरिया, एम.एन. बुच यांचा समावेश होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या वेळी विरोधी पक्ष नेते सत्यदेव कटारे यांनी अक्षय सिंह व नम्रता दामोर यांनाही श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला पण संसदीय कामकाजमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी असे सांगितले, की जर यादीत नसलेला एखादा विषय उपस्थित करायचा असेल, तर विरोधकांनी पूर्वपरवानगी घ्यावी.