मुंबईतील लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार करणारे वाडिया रुग्णालय सुरु राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी यांसदर्भात बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केली, त्यामुळे आता हे रुग्णालय नेहमीप्रमाणे रुग्णांच्या सेवेत कार्यरत राहणार आहे.

मुंबईत गोरगरीबांना आरोग्याच्या सुविधा स्वस्तात उपलब्ध करुन देणारे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र, स्वस्तात उपचार होणारे हे रुग्णालय बंद होता कामा नये अशी भूमिका अनेक समाजिक संघटनांनी घेतली होती. तसेच आपल्यावर बेकारी कुऱ्हाड कोसळणार असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलनही छेडले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील बैठक पार पडली. या बैठकीला वाडिया रुग्णालयाचे नस्ली वाडिया हे स्वत: उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व इतर अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांची देखील या बैठकीस उपस्थिती होते.

महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक तो निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून देणार असून इतर मुद्द्यांवर येत्या १० दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या रुग्णालयातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या देखील अबाधित राहतील याबाबत काळजी घेण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्य आणि मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान थकित असल्याचे कारण देत परळ येथील वाडिया रुग्णालय प्रशासनाने ‘बाई जेरबाई वाडिया’ आणि ‘नौरोजी वाडिया’ ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, येथे उपचार घेणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. तसेच शस्त्रक्रियांपासून बाह्य़रुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती.