पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘हुडहुड’ चक्रीवादळाने रविवारी सकाळी ११ च्या सुमारास विशाखापट्‌टनम जवळील कैलासगिरीमध्ये दस्तक दिली आहे. विशाखापट्टनममध्ये सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाने दोन जणांचा बळी घेतला आहे.
आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या तटवर्ती क्षेत्रांना रविवारी ‘हुडहुड’ चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
विशाखापट्टणम येथे रविवारी दुपारी चक्रीवादळ आदळणार असल्याची शक्यता असल्याने तटवर्ती क्षेत्रात असलेल्या पाच जिल्ह्य़ांतील १.११ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. आंध्र प्रदेश सरकारने एकूण पाच लाख १४ हजार ७२५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची व्यवस्था केली आहे, तर लष्कर आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांना मदत आणि बचावकार्यासाठी सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीकाकुलम जिल्ह्य़ातून ३५ हजार जणांना, विझियानगरममधून सहा हजार जणांना, विशाखापट्टणममधून १५ हजार जणांना, पूर्व गोदावरी जिल्ह्य़ातून ५० हजार जणांना आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातून पाच हजार जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन व्यवस्थापन आयुक्त ए. आर. सुकुमार यांनी सांगितले.
या चक्रीवादळात जीवितहानी होऊ नये यासाठी ओदिशा सरकारने धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. दोन विमानांची उड्डाणे आणि या मार्गावरील ३९ रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरापूत, मलकनगिरी, नवरंगपूर, रायगड, गजपती, गंजम, कालाहंडी आणि कंधमाळ जिल्हाधिकाऱ्यांवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘हुडहुड’ चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्याने आंध्र प्रदेश आणि ओदिशात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
*‘हुडहुड’ चक्रीवादळ रविवारी विशाखाटप्पणम येथे थडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून त्यापूर्वी सकाळी ताशी १९५ कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.