दोन चाकी सायकल चालविण्याचे वा चालण्याच्या ‘पायपिटासना’चे फायदे सर्वज्ञात आहेतच, आता त्या फायद्यांना सूक्ष्म संशोधनाचाही दुजोरा मिळाला आहे.  जे भारतीय लोक कामाच्या ठिकाणी चालत किंवा सायकलवर जातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो व त्यांच्या लठ्ठपणा किंवा वजन वाढण्याची शक्यताही दुरावते. एवढेच नव्हे तर मधुमेह व उच्च रक्तदाबापासूनही त्यांचा बचाव होतो असे नव्या अभ्यासात दिसून आले आहे.  लोकांनी शारीरिक हालचाली जास्तीत जास्त होतील अशा प्रकारची वाहतुकीची साधने वापरली तर जोखमीच्या बाबी कमी होऊ शकतात. विशेष म्हणजे येत्या दोन दशकात भारतातील कमी व मध्यम उत्पन्न गटातील लोकांमध्ये मधुमेह व हृदयविकाराची शक्यता वाढणार आहे व त्याचा फार मोठा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार आहे, असे इंपिरियल कॉलेज लंडन व पब्लिक हेल्थ फाउंडेशन या दोन संस्थांच्या संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधन काय?
पीएलओएस मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात २००५-०७ दम्यान भारतातील ४००० लोकांच्या आरोग्याची व शारीरिक हालचालींची माहिती घेण्यात आली होती. त्यात उत्तरकेडील लखनौची हिंदुस्थान अ‍ॅरोनॉटिक्स लिमिटेड , मध्य भारतातील नागपूरची इंडोरामा सिंथेटिक्स लि., दक्षिण भारतातील हैदराबादची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. व बंगलोरची हिंदुस्थान मशीन टूल्स लि. या कंपन्यांत काम करणाऱ्या लोकांची माहिती घेण्यात आली होती. संशोधकांना मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात ६८.३ टक्के लोक सायकल चालवत, तर ११.९ टक्के लोक चालत कामावर जातात. निम्मे लोक खासगी वाहनांनी कामाच्या ठिकाणी जातात. ३८ टक्के लोक सार्वजनिक वाहनांनी कामावर जातात त्यांचे वजन जास्त दिसून आले. सायकलवर कामावर जाणारे किंवा चालत जाणारे कर्मचारी यांचे वजन कमी असल्याचे दिसून आले. सायकलचा वापर करणारे किंवा चालत जाणारे यांच्यात मधुमेह व उच्च रक्तदाबाचे प्रमाण एकदम कमी होते.

नवा सल्ला काय?
चालणे किंवा सायकल चालवणे हे केवळ पर्यावरणालाच उपकारक आहे असे नाही तर आपल्या व्यक्तिगत प्रकृतीलाही ते उपयुक्त आहे, लोकांनी कामावर जाताना चालत गेले किंवा सायकलवर गेले तर त्यांना जिममध्ये जाऊन आणखी वेळ घालवावा लागणार नाही, असे असले तरी भारतीय शहरे व गावांमध्ये सायकलचा प्रवास सुरक्षित करण्याची मात्र गरज आहे. सार्वजनिक वाहतूक वाढवणे गरजेचे आहे कारण त्यातही बस किंवा रेल्वे स्थानकापर्यंत चालत जावे लागते, असे मत प्रमुख संशोधक ख्रिस्तोफर मिलेट यांनी व्यक्त केले आहे.