भारतातून अमेरिकेत जाऊन कंपन्यांमधील मोठय़ा पदावर विराजमान झालेले अधिकारी हे दूरदृष्टीचे आहेत, त्यातच त्यांच्या यशाचे रहस्य सामावलेले आहे, असे अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या आर्थिक वृत्तपत्राने म्हटले आहे. गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर जन्माने भारतीय असलेले सुंदर पिचाई यांची नियुक्ती झाल्याच्या संदर्भात ही टिप्पणी करण्यात आली आहे.
पिचाई यांना मिळालेल्या बढतीमुळे मूळ भारतीय असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा जगातील नामांकित कंपन्यातील वाटा वाढला आहे, असे सांगून त्यात म्हटले आहे, की भारतातून आलेले व्यवस्थापक दूरदृष्टीचे आहेत व त्यांच्या अंगी नम्रता आहे व व्यावसायिक इच्छाशक्ती आहे, त्यामुळे ते यशस्वी झाले आहेत, अनेक मोठय़ा संस्थांच्या बांधणीत भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. सत्या नाडेला यांनीही एके काळी जे शक्य वाटत नव्हते ते करून दाखवताना मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारीपद पटकावले आहे. सिलिकॉन व्हॅलीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवली. प्रतिस्पर्धी उत्पादनांना शत्रू मानले नाही. त्यांचे पूर्वसुरी स्टीव्ह बॉलमर मात्र नेमके याच्या विरुद्ध रणनीतीचे पुरस्कर्ते होते. भारतीय व्यवस्थापक अनेक कंपन्यांचे संस्थापक नाहीत पण तरी त्यांना व्यवस्थापक म्हणून मोठा मान मिळत आहे. त्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. अ‍ॅडोबचे प्रमुख शंतनु नारायण यांचे वर्णन त्यांचे सहकारी अतिशय शांत पण स्पर्धात्मक असे करतात. २००७ मध्ये ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनीत बरेच परिवर्तन घडवून आणले. ग्लोबल फाउंड्रीज या कंपनीचे संजय झा यांनी आधी मोटोरोलात काम केले आहे व त्यांनी क्वालकॉममध्येही अनेक वर्षे वरिष्ठ पदावर अनुभव घेतलेला आहे.
आणखी एका लेखात वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे, की पिचाई यांनी गुगलमध्ये प्रगती करताना क्रोम ब्राउजर व क्रोम ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली, त्यांनी स्पर्धात्मक दडपण, मतभेद मिटवणे, गुगलच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवणे ही कसरत केलीच शिवाय त्यांनी क्रोम ब्राऊजरचा बाजारपेठेतील वाटा ४५ टक्क्य़ांपर्यंत नेला आहे, जो २००९ मध्ये १ टक्का होता, असे स्टॅटकाउंटर या आस्थापनेने म्हटले आहे.

यशाचे गमक
’प्रतिकूल स्थितीत काम करण्याची सवय
’सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणे
’प्रतिस्पर्धी उत्पादनांना शत्रू न मानणे
’कंपनी राजकारणात दुसऱ्याची कमी हानी करणे
’नम्रतेची वागणूक