भारतातली ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्ट अमेरिकी जायंट कंपनी वॉलमार्ट हिला 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे. भारतामध्ये असलेल्या संधीचा विचार करता ही बाजारपेठ जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. भारतातल्या ई-कॉमर्सच्या बाजारपेठेमध्ये आमूलाग्र परीवर्तन घडवणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये भागीदारी मिळण्याची संधी आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी भावना वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.

हे मेगाडील करण्यासाठी मॅकमिलन सध्या भारतात आले आहेत. फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांबरोबरच मॅकमिलन सरकारी अधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी घेणार असून भारतामधल्या व्यवसायवृद्धीच्या संधींचा अंदाज घेणार आहेत. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, “भारतामध्ये गुंतवणूक येणं प्रचंड महत्त्वाचं आहे. रिटेल क्षेत्रामधल्या पुढील काळात येऊ घातलेल्या लाटेमध्ये स्वार होण्यासाठी मोठ्या प्रमणावर येणाऱ्या गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.”

याखेरीज वॉलमार्ट आणखी दोन अब्ज डॉलर्स किंवा 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये करणार आहे. फ्लिपकार्ट विकत घेण्यासाठी वॉलमार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अॅमेझॉनही स्पर्धेत होती. परंतु फ्लिपकार्टनं वॉलमार्टला पसंती दिली. तज्ज्ञांच्या मते ई-कॉमर्स क्षेत्रामधलं दुसरी कंपनी ताब्यात घेण्याच्या बाबतीत हे जगातलं सगळ्याच मोठं डील आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारात वॉलमार्ट व अॅमेझॉन यांचं व्यापार युद्ध आमने सामने रंगणार आहे.

दरम्यान, अॅमेझॉनने भारतीय कंपनीमध्ये 2,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात भारतात अॅमेझॉनने केलेली गुंतवणूक 10,750 कोटी रुपये इतकी झाली आहे. भारतातला ई-कॉमर्सची उलाढाल गेल्या वर्षी 21 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. इंटरनेटचा वापर जसा वाढेल तशी ही उलाढालही वाढणार आहे.