वॉलमार्ट इंक, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट फाउंडेशन हे भारताच्या करोना विरोधातील एकत्रित लढ्याला सक्रिय मदत करत आहेत. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले जात असून शेतकरी आणि लहान उद्योगांना अत्यावश्यक साहित्य पुरवणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत दिली जात आहे.

करोनाविरोधातील पहिल्या फळीतील प्रयत्नांना मदत म्हणून वॉलमार्ट इंक आणि फ्लिपकार्टच्या वतीने ३८.३ कोटी रुपये मूल्य असलेल्या वस्तू देणगीच्या स्वरुपात भारतात आणल्या जाणार आहेत. एन९५ मास्क आणि मेडिकल गाउन यांसारख्या पीपीई सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना पुरवण्यासाठी सेवाभावी संस्थांना उपलब्ध करून देण्यावर या कंपन्या लक्ष केंद्रित करणार आहेत. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांनी यापूर्वीच ३ लाख एन९५ मास्क आणि १० लाख मेडिकल गाउन्स तयार ठेवले असून आघाडीवर राहून कोव्हिड-१९ विरोधात लढा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या जागतिक पुरवठा साखळीचा पूर्ण ताकदीने वापर केला जाणार आहे.

वस्तू स्वरुपातील या मदतीखेरीज वॉलमार्ट फाउंडेशनच्या वतीने या कसोटीच्या काळात कमकुवत समाजघटकांना मदत करणाऱ्या गूंज आणि सृजन या सेवाभावी संस्थांना ७.७ कोटी रुपयांची देणगी देण्यात येत आहे. शेतकरी, ग्रामीण समुदाय आणि लघु व्यावसायिकांना अन्न, औषधे, स्वच्छतेची साधने यांसारख्या अत्यावश्यक बाबींचा पुरवठा या संघटनांना करता यावा, यासाठी या निधीचा वापर केला जाणार आहे.

“कोव्हिड-१९ मुळे भारतातील आमचे ग्राहक व सहयोगी यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत,” असे वॉलमार्टच्या कार्यकारी उपाध्यक्ष व चीफ सस्टेनिबिलिटी ऑफिसर आणि वॉलमार्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅथलीन मॅकलॉगलिन म्हणाल्या. “अशा कसोटीच्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजाला आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी, सेवाभावी संस्था आणि सरकारी संस्थांच्या प्रयत्नांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात अशा प्रकारची मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी असून आम्ही देखील अशी मदत करण्यास उत्सुक आहोत.”

“कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीला काळजीपूर्वक आणि सहृदयतेने तोंड देण्यासाठी आमची फ्लिपकार्ट टीम अव्याहत कार्यरत आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आज ज्या तातडीच्या मदतकार्याची आम्ही घोषणा करत आहोत, त्यातून या अभूतपूर्व अशा आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रासोबत मिळून काम करत राहाण्याची आमची कटिबद्धताच अधोरेखित होते,” असे फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले.

भारतीय ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहावा, यासाठी आपली पुरवठा साखळी सुरू ठेवण्याची खबरदारी घेतानाच कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती सातत्याने विकसित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट सार्वजनिक आरोग्य आणि ग्राहक व सहयोगी घटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी महत्त्वाची पावले उचलत आहेत. यात संपूर्ण पुरवठा साखळी आणि वितरण यंत्रणेत स्वच्छताविषयक बाबींची अमलबजावणी, कर्मचाऱ्यांसाठी विमा व आरोग्यविषयक लाभ, शक्य त्या ठिकाणी विनासंपर्क वितरण व्यवस्था आणि कॅशलेस पेमेंटला प्राधान्य यांचा समावेश आहे.