राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीर करायला हवा आणि एनडीएच्या बैठकीतच या उमेदवाराचे नाव निश्चित करावे, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी व्यक्त केले. 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी भारतीय जनता पक्षातील काही नेते आणि काही धार्मिक संघटनांचे नेते दबाव टाकीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर एनडीएचा महत्त्वाचा घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव नक्कीच निवडणुकीच्या आधी जाहीर करायला हवे. मात्र, निवडणुकीच्या एक वर्ष आधी नाव जाहीर करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नाव जाहीर करायला कोणतेही मुदत आपण ठरवून दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. एनडीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आघाडीच्या एकत्रित बैठकीत निश्चित करावा, असे जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले होते. त्यालाही नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला.