बलुचिस्तानमधील जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांनी आमच्यावर एखादा चित्रपट काढावा, अशी मागणी ‘बलुच रिपब्लिकन पार्टी’चे नेता बरहुमदाग बुगती यांनी केली आहे. मी अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांचा खूप मोठा चाहता आहे. या दोघांनी बलुचिस्तानवर चित्रपट तयार करावा, अशी विनंती मी करतो. बरहुमदाग हे बलुचिस्तानचे प्रसिद्ध दिवंगत नेते अकबर खान बुगती यांचे नातू आहेत. अमिताभ बच्चन हे चित्रपटात माझे आजोबा अकबर खान बुगती यांची भूमिका खूप चांगल्याप्रकारे साकारू शकतात. आम्हाला आशा आहे की तुम्ही दोघे आम्हाला निराश करणार नाही, असे बरहुमदाग बुगती यांनी म्हटले आहे. भारताने हस्तक्षेप करून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यावे, अशी विनंतीही बलुचिस्तानमधील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावरून बोलताना नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानमधील जनतेचे आभार मानले. यावेळी मोदींनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. निष्पापांचे बळी जात असताना आनंद साजरा करणारे आणि दहशतवादाची तळी उचलून धरणारे लोक कसे, असतील असा सवाल उपस्थित करत त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे टोमणा हाणला. शेजारच्या देशाने आमच्याशी लढण्यापेक्षा गरिबीशी लढावे, कारण गरिबीतून मुक्तता हेच सर्वात मोठे स्वातंत्र्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हिसेंच्या मार्गाने कोणाचेही भले होत नाही. भारत हिंसा, दहशतवाद आणि माओवादापुढे कधीच झुकणार नाही, असे मोदींनी ठणकावून सांगितले.
बांगलादेशाप्रमाणे आम्हालाही स्वतंत्र करा; पंतप्रधांनाकडे बलुच नेते बुगती यांचे मागणे
बलुचिस्तानचे लोक नेहमीच पाकिस्तानच्या लष्करापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. पाकिस्तानचे लष्कर आमच्या गावांवर बॉम्ब हल्ले करतात. ते आम्हाला आतंकवादी समजतात आणि त्यांच्यामते आम्हाला भारत आणि नाटोकडून पाठिंबा मिळतो. पाकिस्तानी लष्कराचा हा छळ गेल्या पाच वर्षांपासून वाढला आहे. हे मुशर्रफ यांच्या कारकिर्दीत सुरु झालेले आणि अजूनपर्यंत सुरु आहे, असे बरहुमदाग यांनी एएनआयला सांगितले होते.