पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी इच्छूक उमेदवारांसमोर एक अनोखी अट ठेवली आहे. संबंधित उमेदवाराच्या फेसबूक किंवा सोशल मिडीया पेजला २५००० लाईक्स असतील तरच त्याला निवडणुकीचे तिकीट मिळेल, अशी अट शहा यांनी ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सक्रिय नसलेल्या अनेक नेत्यांची गोची झाली आहे. फेसबुक, टि्वटरचा मर्यादीत वापर किंवा याविषयी माहितीच नसेल तर असे उमेदवार भाजपकडून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक यशात सोशल मिडीयावरून केलेल्या प्रचाराचा मोठा वाटा होता.
उत्तर प्रदेशातील भाजपचे महत्त्वाचे नेते असलेले लक्ष्मीकांत बाजपेयी यांचे ट्विटरवर १०००० फॉलोअर्स आहेत. तर मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी आमदार सुरेश राणा यांच्या फेसबुक पेजला १२,५८६ लाईक्स आहेत. याशिवाय, मेरठचे भाजप खासदार राजेंद्र अग्रवाल यांना फेसबुकवर फक्त १३९५७ लाईक्स आहेत. दरम्यान, आपली पाठिराख्यांची संख्या कमी असली तरी, पुढच्या तीन महिन्यात आपण निर्धारित लक्ष्य गाठू असा विश्वास लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी व्यक्त केला.