अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यापासून अमेरिकी फौजा अफगाणिस्तानमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांनी अफगाणिस्तानमधून काढता पाय घेताच तालिबान्यांनी पुन्हा अफगाणिस्तानवर आपला अंमल प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर झबिउल्लाह मुजाहिद नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने गेल्या २० वर्षांमधला आपला प्रवास सांगतानाच आपण कसे अमेरिकी आणि अफगाणी फौजांच्या नाकाखालून सटकून जायचो, त्यांना कधीच कसे सापडलो नाहीत याविषयीची माहिती दिली आहे. झबिउल्लाह हा अमेरिकी फौजांसाठी वाँटेड तालिबानी होता. मात्र, २० वर्षांच्या वास्तव्यात तो कधीच अमेरिकी फौजांच्या हाती लागला नाही. आता झबिउल्लाह तालिबानी सरकारचा प्रवक्ता आहे.

झबिउल्लाहनं सरकारी प्रवक्ता म्हणून एक्स्प्रेस ट्रिब्युनला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे. गेल्या २० वर्षांत अमेरिकी आणि अफगाणी फौजांनी अनेकदा झबिउल्लाहला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्येक वेळी तो त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याने एकदा घेतलेल्या पत्रकार परिषदेत झबिउल्लाह आल्यानंतर पहिल्यांदाच या नावाचा कुणी व्यक्ती अस्तित्वात आहे, याविषयी काही माध्यम प्रतिनिधींना आश्चर्य झाल्याचं झबिउल्लाहनं सांगितलं.

“अमेरिकी फौजांसमोर देशभर फिरलो!”

झबिउल्लाह म्हणाला, “मी बराच मोठा काळ काबूलमध्ये राहिलो आहे. सगळ्यांच्या नजरेसमोर, अमेरिकी आणि अफगाणी फौजांच्या नाकाखाली मी सगळ्या गोष्टी करत होतो. या काळात मी देशभर फिरलो. मला तालिबान्यांच्या कारवायांची आणि सरकारी परिस्थितीची थेट माहिती उपलब्ध होत होती. याचं आमच्या विरोधकांना फार आश्चर्य वाटायचं”.

“माझा माग काढण्यासाठी ते मोठाल्या रकमा द्यायचे”

दरम्यान, अमेरिकी आणि अफगाणी फौजांच्या हातून अनेकदा निसटल्याचं झबिउल्लाह सांगतो. “मी इतक्या वेळा अमेरिकी आणि अफगाणी फौजांना सापडता सापडता निसटलो आहे, की त्यांना असं वाटायला लागलं होतं की झबिउल्लाह मुजाहिद या नावाची कुणी खरीखुरी व्यक्ती नसून काल्पनिक व्यक्ती आहे”, असं तो म्हणाला. या काळामध्ये अफगाणिस्तानसोबतच आपण पाकिस्तानला देखील जाऊन आल्याचं झबिउल्लाहनं सांगितलं. अमेरिकी फौजा स्थानिकांना माझ्याविषयी माहिती मिळवण्यासाठी मोठमोठ्या रकमा द्यायचे, पण प्रत्येक वेळी मी निसटून जायचो, असं देखील तो म्हणाला.