देशातील रुग्णसंख्या ६०० पार; विषाणू नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जाहीर केल्यानंतर या विषाणूविरोधातील लढा तीव्र झाला आहे. देशातील रुग्णसंख्या ६१२ वर पोहोचली असून, करोना नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत.

करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचे विलगीकरण आणि उपचारासाठी लष्कराच्या आयुध निर्माणी आणि केंद्रीय निमलष्करी रुग्णालयांनी २ हजारांहून अधिक खाटा राखून ठेवल्या आहेत. शिवाय हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेची २ हजार खोल्या असलेली सर्व दहाही वसतिगृहे विलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) स्थापन करण्यासाठी ताब्यात घेतली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोलकातातील २२०० खाटांच्या सरकारी रुग्णालयाने इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या नव्या रुग्णांना दाखल करून घेणे थांबवले असून; ज्यांची प्रकृती सुधारली आहे अशा रुग्णांना घरी सोडण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती दुसऱ्या एका अधिकाऱ्याने दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत शंभरीपार आहे. देशातील ६१२ रुग्णांपैकी ४० रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, घरातच राहणे हा करोनाचा सामना करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.

‘शिस्त पाळा’

टाळेबंदी सुरू होताच लोकांनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केली होती. पण, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद होणार नाहीत. दूध, भाजीपाला, अन्नधान्य, मांस, पशुचारा या वस्तू मिळतील. काही दुकानदारांनी ग्राहकांना सहा फुटांचे अंतर राखण्यासाठी वर्तुळ आखून दिले. त्या वर्तुळात रांगेत उभे राहून सामान विकत घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक ग्राहकाने ही शिस्त पाळली तर करोनाचा संसर्ग टळेल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

राज्यात १२२ रुग्ण

राज्यातील करोना विषाणूची रुग्णसंख्या १२२ वर गेली आहे. सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. मुंबईत पाच नवे रुग्ण आढळले असून, ठाण्यातही आणखी एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

हे वर्तन चुकीचे!

काही डॉक्टर, पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटय़ांमधून विरोध होत आहे. त्यांना बाहेर पडू दिले जात नसल्याचे अनुभव आल्याच्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, सोसायटय़ांमधील लोकांचे हे वर्तन चुकीचे असून हे रक्षणकर्ते लोकांचीच सेवा करत आहेत. लोकांचे जीव वाचवत आहेत. त्यांना रविवारी अभिवादन करण्यात आले.  त्यामुळे रक्षणकर्त्यांविरोधात वागणे योग्य नाही.

जगभरातील बळी वीस हजारांसमीप

जगभरात करोनाने आतापर्यंत १९,२४६ बळी घेतले आहेत. चीनमध्ये करोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाल्यापासून आतापर्यंत जगभरातील १८१ देशांमध्ये या विषाणूचे ४,२७,९४० रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक बळी इटलीमध्ये गेले आहेत. इटलीत ६,८२० बळी गेल्याची नोंद झाली असून, एकूण ६९,१७६ जणांना लागण झाली आहे. त्यापाठोपाठ स्पेनमध्ये ३,४३४ जणांचा बळी गेला आहे.

महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आता संपूर्ण देश करोनाविरोधातील युद्घ लढत आहे. या युद्धात २१ दिवसांत आपला विजय होईल.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान