पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरु असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.

पाकिस्तानचे त्यांच्या सहकारी देशांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे जर ताणावाच्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तसेच उद्रेकाची स्थिती निर्माण झाल्यास त्यांची मदत घेण्यात येईल, असे पाकिस्तानच्या राजकीय सुत्रांनी म्हटल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शत्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. तसेच याला भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आले. मात्र, त्यानंतर भारताने सैन्याने जमवाजमव सुरु केल्यानंतर पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले, आम्ही स्वतःहून कुठलीही तयारी करीत नाही आहोत, मात्र तुम्ही युद्धासाठी तयारी करीत असाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे, युद्धासंबंधीचे असे सूचक विधानही त्यांनी केले होते.

भारत पाकिस्तान या दोन्ही देशांतील युद्धाच्या शक्यतेबाबत गफूर म्हणाले की, या दोन्ही देशांमध्ये युद्ध व्हावे अशी आमची इच्छा नाही. भारत आम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकत नाही उलट आम्हीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतो, त्यामुळे भारताने पाकिस्तानशी वाद घालू नये, असा चिथावणीचा इशाराच गफूर यांनी भारताला दिला आहे.