कारगिल युद्धाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात येईल असे संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी सांगितले.  कारिगल विजयाचा पंधरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिनानिमित्त कारगिल हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैनिकांनी दाखवलेले धैर्य व केलेला त्याग सदैव देशाच्या स्मरणात राहील, देशाचा या शूर सैनिकांना सलामच आहे असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे
पाकिस्तानबरोबर १९९९ मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते.
त्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेटली यांनी सांगितले की, इंडिया गेट भागातील प्रिन्सेस पार्क येथे आपण तीनही सेनादलांच्या प्रमुखांसह भेट देऊन युद्धस्मारक बांधण्याबाबत निर्णय घेणार आहोत. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांची नावे त्या स्मारकांवर कोरली जातील. प्रिन्सेस पार्क हा मोठा भाग असून तीच सर्वात चांगली जागा आहे. एक-दोन दिवसात तेथे भेट देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. स्मारकाच्या बांधणीला वेळ लागेल कारण  हे युद्धस्मारक व युद्ध संग्रहालयही असणार आहे.
त्याच जागेत ते बांधले जाईल. ही जमीन खूप मोठी आहे व युद्ध स्मारक व संग्रहालयासाठी योग्य आहे असे आपल्याला वाटते. यातील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर विविध खात्यांच्या परवानग्या घेतल्या जातील.
तूर्त तरी अशी योजना आहे व ती पूर्णत्वास जायला वेळ लागेल.