युद्धामुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्धानंतरही संवादाच्या माध्यमातूनच प्रश्न सोडवावे लागतात, अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी डोक्लाम प्रश्नावर राज्यसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली. यासोबतच दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाहीत, असे म्हणत स्वराज यांनी पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरदेखील भाष्य केले आहे. आम्हाला मैत्री हवी आहे, मात्र त्यासाठीचा रस्ता एकमार्गी असू शकत नाही, असे स्वराज यांनी म्हटले.

‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही. युद्धानंतरही संवाद साधावा लागतो. त्यानंतरच तोडगा काढता येऊ शकतो. डोक्लाम प्रकरणात वाटाघाटींच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आहे. चीनसोबत चर्चा सुरु असून त्या माध्यमातूनच मार्ग काढता येऊ शकतो,’ असे सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले. डोक्लाम प्रश्नावर बोलताना सुषमा स्वराज यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ‘देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते डोक्लामबद्दलची स्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय नेतृत्त्वासोबत चर्चा करण्याऐवजी चीनच्या राजदूतांसोबत चर्चा करण्याला प्राधान्य दिले,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

‘पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. संपूर्ण काश्मीर भारताचे आहे. जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा केली जाऊ शकत नाही. पाकिस्तानच्या भूमिकेत गेल्या काही महिन्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळेच पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्याची जबाबदारी झटकून टाकता आली नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर असे पहिल्यांदाच घडले,’ असे स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले.

केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण यशस्वी ठरले आहे. त्यामुळे अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश भारतासोबत आहेत. इस्रायल आमचा मित्र देश आहे. मात्र आम्ही पॅलेस्टिनी प्रश्नावरील भूमिकेत बदल करणार नाही आणि हा आमचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १७ वर्षांमध्ये नेपाळमध्ये गेलेले पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या १७ वर्षांपैकी ११ वर्षे देशात काँग्रेसचे सरकार होते. दोन-तीन बाजूंनी भारताची कोंडी झाली आहे, असे विरोधक म्हणतात. त्यांनी राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये काय झाले होते हे आठवून पाहावे,’ असा टोला स्वराज यांनी काँग्रेसला लगावला.