‘जैश-ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने भारताला धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर येत असतानाच आता ‘अल- कायदा’ या दहशतवादी संघटनेनेही काश्मीर प्रश्नावरुन भारताला धमकीच दिली आहे. कोलकाता, बेंगळुरु आणि दिल्लीत हल्ला केल्यास भारतीय सैन्याची जम्मू-काश्मीरमधील पकड सैल होईल आणि आपल्याला तिथे विजय मिळेल, असे अल- कायदाचा भारतीय उपखंडातील दुसऱ्या स्थानावरील नेता उसामा महमूदने म्हटले आहे.

मंगळवारी रात्री सोशल मीडियावर उसामा महमूदचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यात महमूद काश्मीर प्रश्नावर भाष्य करताना दिसतो. उपखंडात जिहादी चळवळ आणखी तीव्र करणे गरजेचे असून उपखंडात राहणाऱ्या मुस्लिमांनी काश्मिरी जनतेच्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन त्याने व्हिडिओत केले. महमूदने अमेरिकेचे उदाहरण दिले आहे. महमूद म्हणतो, अमेरिकेकडे बघा. जगाचे रक्षण करता करता त्यांना स्वतःच्या रक्षणाकडे लक्षच देता आले नाही. भारतीय सैन्य आणि हिंदू सरकारच्या भारताला आता ‘युद्ध भूमी’च केली पाहिजे, असे त्याने सांगितले.

भारतीय सुरक्षा दलाचे ६ लाख जवान काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यामुळे आपण कोलकाता, बेंगळुरु आणि दिल्लीत हल्ला केल्यास त्यांना दुसरीकडेही लक्ष द्यावे लागेल आणि काश्मीर आपलाच होईल, असे महमूदने समर्थकांना उद्देशून सांगितले. काश्मीरमधील लढाईसाठी अल-कायदाचे अनेक दहशतवादी पाकिस्तानमध्ये पोहोचले. मात्र, पाकिस्तानी सैन्याने या दहशतवाद्यांवर कारवाई करुन मोहीमेत अडथळा आणला, असा आरोप महमूदने केला आहे.

तर दुसरीकडे अल-कतार नामक दहशतवादी संघटनेनेही एक व्हिडिओ जाहीर केला आहे. या दहशतवादी संघटनेने स्वतःला आयसिस समर्थक म्हटले आहे. ‘अल-कायदा’ने आयसिसला पाठिंबा जाहीर करावा, असे या संघटनेने म्हटले आहे. या व्हिडिओची सुरक्षा यंत्रणांनीही दखल घेतली आहे. मात्र या सर्व संघटना भारतात फारशा सक्रीय नाहीत, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

ओसामा बिन लादेनची ‘अल-कायदा’ ही दहशतवादी संघटना भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये सक्रीय झाली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसाकडे जम्मू-काश्मीरची जबाबदारी देण्यात आली आहे. झाकीर मुसानेही भारतविरोधी विधान करुन जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले होते.