पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी भारताशी युद्ध हा पर्याय योग्य नसून, काश्मीर आणि इतर प्रश्न केवळ चर्चेच्या माध्यमातून सोडवता येतील, असे मत व्यक्त केले आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स’च्या दक्षिण आशिया केंद्रामध्ये ‘फ्यूचर ऑफ पाकिस्तान २०१७’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. काश्मीर प्रश्न हा गंभीर मुद्दा असून त्यावरील तोडगा निघेपर्यंत भारताबरोबर तणावपूर्ण संबंध कायम राहतील, असे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्वतंत्र काश्मीरच्या विचाराला आपले समर्थन नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.

काश्मीरबद्दल बोलताना अब्बासी यांनी मागील पाकिस्तानी पंतप्रधानांप्रमाणेच आडमुठी भूमिका घेतल्याचे दिसून आले. ‘काश्मीर हा भारत पाकिस्तान चर्चेतील मूळ मुद्दा असून तो प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्णच राहतील. आम्ही नेहमीच काश्मीर प्रश्नावर चर्चेसाठी तयार असतो. कारण चर्चेमधूनच हा प्रश्न सुटू शकतो. भारताबरोबर युद्ध हे या प्रश्नावरील उत्तर नाही’, असे मत अब्बासी यांनी मांडले.

पुढील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांदरम्यान या प्रश्नावर चर्चेमध्ये काही विशेष प्रगती होणार नाही, असे मतही अब्बासी यांनी व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये २०१९ साली सार्वत्रिक निवडणुका असल्याने या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. या काळात कोणताही देश या प्रश्नाबद्दल पुढाकार घेईल, असेही वाटत नसल्याचे सांगितले.