भारतावरील दहशतवादाची छाया नष्ट करायची असेल तर पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय नाही. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संवादप्रक्रिया सुरूच राहिली पाहिजे, असे मत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मांडले. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना सुषमा स्वराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यातील नुकत्याच झालेल्या उफा आणि पॅरिस भेटीनंतर दोन्ही देशांनी दहशतावादासंबंधीची चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. त्यामुळेच बँकॉक येथे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) बैठक झाली. त्यानंतर आम्ही ही चर्चा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
अमेरिकेने ओसामा बिन लादेनला शोधून काढण्यासाठी ज्याप्रकारचे पर्याय वापरले तशाचप्रकारचे पर्याय दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताकडून वापरले जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न यावेळी स्वराज यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, भारत सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी छावण्यांविषयी पाकिस्तानशी चर्चा करत आहे. मात्र, त्यासाठी पाकिस्तानशी युद्ध करणे हा पर्याय नाही. आगामी काळातही आम्ही चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून दहशतवादाची छाया नष्ट करता येईल. मात्र, संवाद आणि दहशतवाद या गोष्टी एकाचवेळी सुरू ठेवता येणार नाहीत, या पंतप्रधानांच्या विधानाची आठवणही स्वराज यांनी यावेळी करून दिली.