अमेरिकेत चालू आठवडा हा अत्यंत घातक ठरणार असून ९/११ हल्ला किंवा पर्ल हार्बर बॉम्ब हल्ल्यापेक्षाही भीषण स्थिती ओढवणार आहे, असे मत एका वरिष्ठ डॉक्टरने व्यक्त केले आहे.

अमेरिकेत करोनामुळे ९६२४ बळी गेले आहेत, तर ३३६९०६ बाधित रुग्ण आहेत.  या परिस्थितीतही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रमुख ठिकाणी करोना बळींची संख्या आता स्थिरावत चालल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे महा शल्यविशारद व्हाइस अ‍ॅडमिरल जेरोम अ‍ॅडम्स यांनी सांगितले, की करोनामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ९/११ हल्ला व पर्ल हार्बरचा हल्ला या दोन  भीषण घटना होत्या तसेच काहीसे आता घडत आहे. पुढील आठवडय़ात अमेरिका पुन्हा पर्ल हार्बर किंवा ९/११ क्षण अनुभवणार आहे. ९/११ हल्ल्यात २००१ मध्ये २९७७ लोक मारले गेले होते तर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला त्यात दुसऱ्या महायुद्धावेळी २४०० लोक मारले गेले होते.

व्हाइट हाऊसच्या करोना दलाने १ ते २ लाख लोक करोनाने मरतील अशी शक्यता वर्तवली आहे.  अमेरिकेतील एकूण ३३ कोटी लोकांसंख्येपैकी ९५ टक्के  नागरिक सध्या घरात आहेत.

चीनमधून ४ लाख ३० हजार जण अमेरिकेत

दी न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार  चीनचे करोना केंद्र असलेल्या वुहान व तेथील इतर भागातून ४ लाख ३० हजार प्रवासी थेट विमानांनी अमेरिकेत आले होते. चीनने करोनाची साथ उघड केल्यानंतरच्या काळात ते अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत या विषाणूचा प्रसार नंतर वेगाने होत गेला. चीनमधून अमेरिकेतील १७  शहरात या काळात  १३०० विमाने आली व त्यामुळेच या प्रवाशांना अमेरिकेत येणे शक्य झाले. अर्थात तोपर्यंत ट्रम्प प्रशासनाने हवाई निर्बंध लागू केले नव्हते. गेल्या दोन महिन्यात चीनमधून अमेरिकेत आलेल्यांची संख्या ४० हजार आहे.