संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) भारताला टोळधाडीबाबत पुढील चार आठवडे अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, टोळधाडीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू केला आहे.

देशात राजस्थानला टोळधाडीचा सर्वात मोठा फटका बसला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारलाही टोळधाडीचा फटका बसला आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवरून आलेली टोळधाड पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा राजस्थानमध्ये येण्याची शक्यता आहे, असे एफएओने म्हटले आहे.

इराण आणि पाकिस्तानातून आणखी टोळधाड येत असून देशात आलेली टोळधाड राजस्थानमध्ये जुलै महिन्याच्या पूर्वार्धात परतण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यासह सुदान, इथिओपिया, दक्षिण सुदान आणि सोमालियाने पुढील चार आठवडे अधिक दक्ष राहिले पाहिजे, असेही एफएओने म्हटले आहे.