लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा इशारा

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद थांबला नाही तर ‘प्रतिव्यूहात्मक कारवाई’ करण्याचा पूर्ण अधिकार भारताला असेल, असा इशारा नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारताच पाकिस्तानला दिला.

जनरल बिपिन रावत हे लष्करप्रमुखपदावरून मंगळवारी निवृत्त झाले. त्यांची संरक्षणप्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) नेमणूक करण्यात आली आहे. जनरल रावत यांच्याकडून जनरल नरवणे यांनी मंगळवारी देशाचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत काश्मीर, सीमेपलीकडील दहशतवाद आदी मुद्दय़ांवर भाष्य केले.

‘‘स्वत:च्या सरकारपुरस्कृत दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न पूर्णत: अपयशी ठरले आहेत. दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे जाळे भारताने उद्ध्वस्त केल्याने पाकिस्तानी लष्कराच्या छुप्या युद्धाला धक्का बसला आहे. मात्र, पाकपुरस्कृत दहशतवाद सुरूच राहिला तर दहशतवाद्यांच्या तळांवर ‘प्रतिव्यूहात्मक कारवाई’चा अधिकार भारताला असेल. लक्ष्यभेदी कारवाई आणि बालाकोटमधील हल्ल्यावेळी भारताने त्याचे प्रदर्शन केले आहे,’’ असे जनरल मनोज नरवणे यांनी सांगितले. मूळचे पुण्याचे असलेले जनरल नरवणे हे आधी लष्कराचे उपप्रमुख होते. नरवणे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी लष्कराच्या पूर्व भागाचे नेतृत्व केले आहे. त्यात चीनलगतच्या ४००० किलोमीटर सीमेचा समावेश आहे. नरवणे यांनी ३७ वर्षांच्या सेवेत अनेक पदांवर काम केले असून त्यात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमेतील सहभागाचा समावेश आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे त्यांनी काश्मीरमध्ये नेतृत्व केले होते, तर पूर्वेकडे पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व केले होते.

श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांतिसेनेतही त्यांचा सहभाग होता. म्यानमारमध्ये भारतीय संरक्षण दलाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. त्यांना जम्मू-काश्मीरमधील कामगिरीसाठी सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

आसाम रायफल्सचे महानिरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा विशिष्ट सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला होता. प्रतिष्ठित स्ट्राइक कोअरचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक देण्यात आले.

‘काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा’

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली, असे निरीक्षण नवे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी नोंदवले. काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या आणि दहशतवादासंबंधीच्या घटना कमी झाल्या आहेत, असे जनरल नरवणे म्हणाले.