वर्षभरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये दोनदा वाढ होण्याची शक्यता आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरु झाल्याने टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वस्तू आणि सेवा करामुळे अतिरिक्त कर भरावा लागतो आहे. त्यामुळे व्हिडीओकॉन, पॅनासॉनिक, एलजी, व्हर्लपूल कंपन्यांकडून लवकरच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढत आहेत. त्यातच आता वस्तू आणि सेवा कराची भर पडली आहे. त्यामुळे येणाऱ्या उत्सव काळात कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत वाढ केली जाऊ शकते. फेब्रुवारी महिन्यापासून स्टील, तांबे, प्लास्टिकच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. एसी आणि फ्रिजसाठी आवश्यक असलेल्या कॉम्प्रेसरच्या किमतींमध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर टीव्हीसाठी आवश्यक असणाऱ्या पॅनलच्या किमती ३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे लवकरच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढणार आहेत.

विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनचा दबाव असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दर वाढीचा निर्णय उत्सव काळापर्यंत पुढे ढकलला आहे. ‘आम्ही अद्याप वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. स्टील, तांबे आणि प्लास्टिकच्या वाढलेल्या दरांचा नेमका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरांवर नेमका काय परिणाम होईल, याचाही विचार केला जात आहे,’ अशी माहिती व्हर्लपूलचे इंडियाचे कपिल अगरवाल यांनी दिली.

‘वस्तू आणि सेवा करामुळे टीव्ही, फ्रिज आणि मायक्रोव्हेव यांच्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती पॅनासॉनिक इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी मनिष गुप्ता यांनी दिली. ‘इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतींमध्ये वाढ सुरु झाली आहे. मात्र डॉलरचे मूल्य घसरल्याने अद्याप कंपन्यांचे नुकसान काही प्रमाणात टळले आहे,’ अशी माहिती व्हिडीओकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. सिंग यांनी सांगितले.