रस्त्यांवर वाहणारं पाणी, हळुवार चालणारी वाहनं, पावसाच्या पाण्यात अर्ध्यापेक्षा अधिक बुडालेल्या कार हे सध्या दोन प्रमुख शहारांचे वर्णन ठरत आहे. यातील एक म्हणजे भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई तर दुसरे आहे जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी. सध्या ही दोन्ही शहर पाण्याखाली आहेत.

मुंबई आणि वॉशिंग्टन डीसी या दोन्ही महानगरांमधील रस्त्यावरील परिस्थिती सद्यस्थितीस सारखीच आहे. सोमवारी झालेल्या पावसानंतर दोन्ही शहर रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. मुंबईत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. परिणामी शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखील गेले. वाहतूकीची कोंडी होऊन वाहनांच्या दुरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे वॉशिंग्टन डीसी शहारास देखील अचानक आलेल्या पुराने झोडपून काढले.

युनायटेड स्टेटच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी एक तास झालेल्या जोरदार पावसाचा शहाराला चांगलाच फटका बसला. शहरात ८४ मिमी पावसाची नोंद झाली. मेट्रो स्टेशनच्या छतामधूनही पाण्याची गळती सुरू झाली. शहरातील प्रमुख संग्रहालय पाण्याच्या अति प्रवाहामुळे बंद करण्यात आली होती. स्थानिक आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी पाण्यात अडकलेल्या कारमधून अनेक लोकांना वाचवले.