पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांच्या आत्मचरित्रात पाकिस्तानी क्रिकेटपटू, नेते आणि सेलिब्रिटींबाबत काही गौप्यस्फोट करण्यात आले आहे. या प्रकरणी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसिम अक्रमसह चार जणांनी रेहम खान यांना नोटीस पाठवली आहे.

रेहम खान यांच्या आत्मचरित्रातील काही भाग नुकताच उघड झाला असून यात पाकिस्तानमधील क्रिकेटपटू, नेते, उद्योगपती आणि इम्रान खान यांच्याबाबत खळबळजनक दावे करण्यात आले आहे. संबंधितांसोबत केलेल्या चर्चेच्या आधारे हा दावा केल्याचे रेहम खान यांनी म्हटले होते. वसिम अक्रमच्या सेक्स लाईफबाबत रेहम खान यांनी म्हटले होते की, वसिम अक्रमने स्वत:च्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवंगत पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले होते. तर ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे उद्योजक सय्यद झुल्फीकार बुखारी यांनी इम्रान खानमुळे गर्भवती झालेल्या एका तरुणीचा गर्भपात करण्यास मदत केल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.

तर इम्रान खान यांच्या पक्षाचे प्रवक्ते अनिल ख्वाजा यांचाच पक्षावर नियंत्रण असल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकातील काही भाग उघड झाल्यानंतर वसिम अक्रम व अन्य मंडळींनी रेहम खान यांना नोटीस पाठवली आहे. या पुस्तकात करण्यात आलेले दावे खोटे आणि निराधार असून याद्वारे आमची प्रतिमा मलिन केली जात आहे, असे नोटीशीत म्हटले आहे.