पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पणजी येथे केलेल्या भाषणावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी जोरदार टीका केली. या भाषणादरम्यान एका क्षणी नरेंद्र मोदी देशासाठी आपले घर, परिवार, गाव या सगळ्याचा परित्याग केला असल्याचे सांगताना काहीसे भावूक झाले होते. मात्र, नरेंद्र मोदींचे अशाप्रकारे भावूक होणे म्हणजे शुद्ध नाटकीपणा असल्याचे करात यांनी म्हटले. सध्या पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपण मोदींचे अश्रू बघायचे की दिवसभर काम करून एकही पैसा हाती न पडणाऱ्या विधवेच्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या २० लाख मजुरांच्या अश्रूंकडे पाहायचे ? पंतप्रधानांनी ही कसला नाटकीपणा चालवला आहे , असा सवालही वृंदा करात यांनी उपस्थित केला.

पणजी आणि बेळगावी येथील नियोजित कार्यक्रमांसाठी आलेल्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काँग्रेसला लक्ष्य केले होते. ते म्हणाले, ‘गेल्या ७० वर्षांपासून देशाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. अनेकांनी यादरम्यान देशाची लूट केली. काही लाख भ्रष्टाचारी लोकांमुळे देशातील कोटय़वधी जनतेला गरिबीचे चटके सहन करावे लागत आहेत. मात्र, आता परिस्थिती बदलणार आहे. नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे कोळसा घोटाळा आणि टूजी घोटाळ्यासारख्या महाघोटाळ्यांमध्ये सहभाग असलेल्या अनेकांना आता चार हजारांसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक विरोधी शक्ती माझ्याविरोधात सक्रिय झाल्या आहेत. ते मला कदाचित जिवंत राहू देणार नाहीत. ते मला नष्ट करतील, कारण त्यांची ७० वर्षांची लूट मी धोक्यात आणली आहे. परंतु मला त्याची तमा नाही. माझे सरकार प्रामाणिकांना त्रास होऊ देणार नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्वस्थ झोपू देणार नाही’.