प्राणिसंग्रहालयात गेल्यावर आपल्याला अनेकदा पिंजऱ्याआड वाघ, सिंह यांच्यासारखी हिंस्त्र श्वापदे पाहायला मिळतात. अशावेळी पिंजऱ्यातील एखादा प्राणी सुटून बाहेर आला आणि त्याने आपल्यावर हल्ला केला, अशी भीतीदायक कल्पना कदाचित आपल्यापैकी काहीजणांच्या मनात तरळूनही गेली असेल. मात्र, नुकताच जपानमधील प्राणिसंग्रहालयात ही भीतीदायक कल्पना प्रत्यक्षात येताना दिसली. याठिकाणी पिंजऱ्यासमोर उभ्या असलेल्या एका दोन वर्षीय चिमुरड्यावर सिंहाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा काचेच्या आवरणामुळे त्याचा हा प्रयत्न फसला. जपानमधील चिबा प्राणिसंग्रहालयात हा प्रकार घडला. याठिकाणी दोन वर्षांचा लहान मुलगा सिंहाच्या पिंजऱ्यासमोर उभा होता. सुरूवातीला या मुलाला बघून सिंहाने दबा धरला आणि मुलाची पाठ वळताच जोरात धावत येऊन त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने सुरक्षेसाठी लावण्यात आलेली काच आडवी आल्याने चिमुरड्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. तब्बल १८० किलो वजन असलेला सिंह काचेवर आपटल्यानंतर चिमुरडा थोडासा घाबरला. मात्र, लवकरच तो सावरला. मात्र, काचेवर आपटल्यानंतर सिंह चांगलाच गोंधळला आणि नंतर माघारी वळला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, सिंह जेव्हा कधी लहान मुलांना पाहतो तेव्हा अशाच प्रकारे वागतो अशी माहिती प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.