किरतपूर-मनाली या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मोठ्याप्रमाणावर झालेल्या भूस्खलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हिमाचल प्रदेशपासून साधारण १८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंडीतील हंगोई येथे ही घटना घडली. त्यामुळे सध्या या महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा राहिल्या आहेत. ही घटना घडली तेव्हा या रस्त्यावर अनेक वाहने होती. मात्र, भूस्खलन सुरू झाल्यानंतर चालकांनी वाहने सोडून पळ काढला. अवघ्या काही मिनिटांतच टेकडीचा अख्खा भाग रस्त्यावर येऊन कोसळला आणि सगळीकडे धुळीचे लोट पसरले. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन ढिगाऱ्याखाली आले नाही त्यामुळे जीवितहानी टळली. सध्या याठिकाणचा रस्ता पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक मंडी-कोटला-बजुरा या पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.