17 January 2021

News Flash

VIDEO: इम्रान खान यांनी दिलेल्या आश्वासनांची पाकिस्तानी खासदाराकडून पोलखोल

इम्रान यांनी दिलेली पण पूर्ण न केलेली एक डझनहून अधिक आश्वासने या खासदाराने वाचून दाखवली

पाकिस्तानी खासदाराकडून पोलखोल

पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) नेते आणि खासदार खुर्शिद शाह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी संसदेमध्ये खुर्शिद यांनी केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणुकांच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचा पाढा वाचला आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांची निकाल जाहीर झाल्यानंतर तीन आठवडयांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. दीड महिन्यामध्ये इम्रान खान यांच्या सरकारला एक वर्ष पुर्ण होणार आहे. मात्र त्या आधीच इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाचा प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या पीपीपीने त्यांनी एका वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत त्यांच्यावर टिका करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत अशी टिका पीपीपीकडून सातत्याने केली जात आहे. अशाच पद्धतीची टिका पीपीपीचे नेते खुर्शिद यांनी संसदेमध्ये आपल्या भाषणामधून केली.

इम्रान खान यांनी वर्षभरापूर्वी निवडणुक प्रचारादरम्यान दिलेली अनेक आश्वसने खुर्शिद यांनी संसदेमध्ये वाचून दाखवली. खुर्शिद ही आश्वासने वाचत असताना पीपीपीच्या इतर खासदारांनी मागून घोषणाबाजी करत खुर्शिद यांचे समर्थन केले. इम्रान खान यांनी कर्ज घेणार नाही असं आश्वासन निडवणुकीच्या वेळी दिलं होतं पण इम्रान सरकारने कर्ज घेतलं असं खुर्शिद म्हणाले. पुढे त्यांनी इम्रान यांच्या आश्वासनांची यादी मांडताना पेट्रोल, गॅस, वीज स्वस्त दरात देणार, मेट्रो बस नाही बनवणार, डॉलर महाग होणार नाही याची काळजी घेईल, भारतासोबत मैत्री करणार नाही, अपक्ष उमेदवारांना पक्षात घेणार नाही, लायब्ररी आणि राज्यपाल सदनावर बुल्डोझर चालवेल, परदेश दौरे करणार नाही, साध्या विमानांनी प्रवास करणार, हेलिकॉप्टर ऐवजी हॉलंडच्या पंतप्रधानांप्रमाणे सायकलने प्रवास करेल, आरोप असणाऱ्यांना कर्ज देणार नाही, कधीच खोटं बोलणार नाही अशी इम्रान यांची सर्व आश्वासने खुर्शिद यांनी वाचून दाखवली. यापैकी एकही आश्वासन इम्रान खान यांनी मागील १० महिन्याच्या कार्यकाळात पूर्ण केले नसून त्यांनी पाकिस्तानी जनतेची फसवणूक केली आहे. आश्वासने द्यायची म्हणून त्यांनी ती निवडणुकीच्या वेळी दिली अशी टिका पीपीपीच्या खासदारांनी केली.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसोंदिवस चिंताजनक होत आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. हे कर्ज माफ करावे तसेच पाकिस्तानला या संकाटामधून बाहेर काढण्यासाठी मदत करावी अशी विनंती इम्रान खान यांनी अनेक देशांकडे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:28 pm

Web Title: watch pakistani parliamentarian khursheed shahs speech on imran khans pledges goes viral scsg 91
Next Stories
1 Video : विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट चेंडू? एका बॉलने कांगारूंसाठी उघडले सेमीफायनलचे दरवाजे
2 वर्षाला कचोरीवाला कमवतो 60 लाख, कमाई पाहून आयकर खात्याला आली जाग अन्…
3 वृत्तवाहिनीवरील लाइव्ह कार्यक्रमात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X