तामिळनाडूमधील नेते सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतात. राजकीय आखाड्याबाहेर खऱ्याखुऱ्या आखाड्यामध्ये नुकताच एका राजकीय नेत्याने आपला हात आजमावला. त्यामुळेच हा नेता आता चर्चेत आला आहे. चेन्नईमधील एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मासेमारी मंत्रालयाचे मंत्री डी जयकुमार यांनी चक्क बॉक्सींग केली. मंत्री महोदयांचा बॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

चेन्नईमधील नेहरु स्टेडियममध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित असणाऱ्या जयकुमार यांनी स्वत: रिंगमध्ये उतरुन बॉक्सिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी पांढरे शर्ट आणि लुंगी अशा पोषाखामध्ये हातात बॉक्सिंग ग्लोव्हज घालून जयकुमार खरोखर बॉक्सिंग केले. आपल्या नेत्याचा हा अवतार पाहून त्यांच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आपल्याला बॉक्सिंगचे थोडेफार ज्ञान आहे, असं सांगत जयकुमार यांनी फूल क्रॉच, सेमी क्रॉच यासारख्या स्टान्सबरोबरच बुक्के मारण्याच्या काही पद्धतींचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. नेत्याने रिंगमध्ये येऊन दाखवलेली प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांचे कौतुक केलं. शेवटी पंचांनी जयकुमार यांचा हात उंचावून ते विजयी झाल्याचं सांगितलं त्यानंतरच जयकुमार रिंगमधून खाली उतरले.

जयकुमार हे अनेकदा आपल्या राजकारणाव्यक्तीरिक्तच्या गोष्टींसाठी कायमच चर्चेत असतात. २०१८ साली जपानमध्ये सहलीसाठी गेले असताना त्यांनी सिंहाबरोबर काढलेला फोटो पोस्ट केला होता तेव्हाही त्यावरुन बरीच चर्चा झाली होती.