आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी किंवा आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी प्रेमवीर कोणती शक्कल शोधून काढतील याचा नेम नसतो. त्यासाठी काहीजण आकाशात किंवा पाण्याखाली प्रेयसीला लग्नाची मागणी घालतात, तर हॅरी पॉर्टरसारख्या चित्रपटांचे चाहते लग्नाच्या खास दिवसासाठी हॉगवर्टसचा सेट उभारतात. मात्र, सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी जे काही केले आहे, ते पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. अमेरिकेच्या अर्कसान्स येथे राहणारा शेन बिर्किनबाईन हा पेशाने गेमर आहे. त्यामुळे त्याने आपल्या याच कौशल्याचा वापर करून आपल्या गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घातली. शेनच्या गर्लफ्रेंडचे नाव पॅम एडवर्डस असे आहे. त्यासाठी त्याने सुपर मारियो मेकर या गेममधील भिंतीमध्ये पॅम एडवर्डसचे नाव लिहून तू माझ्याशी लग्न करशील का, असा संदेश लिहला. ‘सुपर मारियो मेकर २०१५’ या व्हर्जनमध्ये वापरकर्त्याला खेळाची काठिण्यपातळी स्वत:च्या सोयीनुसार बदलण्याची सुविधा आहे. त्याचाच वापर करून शेनने गेममध्ये आपला संदेश लिहला आणि तो गेम पॅमला खेळण्यासाठी दिला. पॅमने हा गेम खेळायला सुरूवात केल्यानंतर विशिष्ट टप्प्यानंतर तिला ‘पॅम विल यू मॅरी मी?’, असा संदेश दिसला. या अनोख्या प्रपोजलने पॅमला आनंदाअश्रू आवरणे कठीण जात होते.