सध्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ अचानकपणे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १९९८ ते २००१ या काळात नरेंद्र मोदी भाजपचे सरचिटणीस असतानाच्या काळातील हा व्हिडिओ आहे. यामध्ये मोदींबरोबर काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि पत्रकार वीर संघवी दिसत आहेत. यावेळी काँग्रेसच्या तत्कालीन रणनीतीविषयी बोलताना मोदी यांनी म्हटले होते की, आम्ही सरकार पडणार नाही, हा काँग्रेसचा दावा मला प्रामाणिक वाटतो. कारण, काँग्रेसचे सध्याचे उद्दिष्ट तिसरी आघाडी नष्ट करणे हे आहे. ही आघाडी नष्ट करून काँग्रेसला आपली मतपेढी परत मिळवायची आहे. जोपर्यंत हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, तोपर्यंत काँग्रेस आमच्याकडे वळणार नाही. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या जयराम रमेश यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये यायला आवडेल का, असा प्रश्न विचारून मोदींना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला भाजपमधून बाहेर पडायचे असेल तर तुमच्यासाठी काँग्रेसमध्ये जागा आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले होते. यावर नरेंद्र मोदी यांनी हजरजबाबीपणे उत्तर दिले. तुम्ही अगोदरच समस्यांचा सामना करत आहात. मी संघ परिवाराचा आहे. त्यामुळे मला काँग्रेसमध्ये आणले तर तुम्हालाच अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, असा टोमणा मोदींनी जयराम रमेश यांना लगावला.

दरम्यान, मंगळवारी केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवर उपहासात्मक टीका केली. गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सकाळी लवकर उठून योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली होती. मोदींच्या या भेटीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृतीनुसार वयोवृद्ध आई आणि पत्नीला सोबतच ठेवले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान  मोठे असून मोदींनी मनही मोठे करावे असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी मोदींना आई आणि पत्नीला सोबत राहायला नेण्याचा सल्लाच दिला. आणखी एका ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले, मी आपल्या आईसोबत राहतो, रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी त्याचा गवगवा करत नाही. मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेत उभे करत नाही असे केजरीवाल यांनी नमूद केले.

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यावेळीही केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्कामास आहेत. तर त्यांच्या मातोश्री मेहसणा येथे भावासोबत राहतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मेहसाणा येथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.