दिल्लीच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) भवनात दोन महिन्यांपूर्वी स्फोटके ठेवण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट एनएसजीचे डेप्युटी जनरल आर. सी. तयाल यांनी केला. ते मंगळवारी नवी दिल्लीतील  राष्ट्रीय सुरक्षा रक्षकदलाच्या (नॅशनल सिक्युरिटी गार्ड : एनएसजी) संयुक्त इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या सुरक्षेत एनएसजीच्या योगदानाचा उल्लेख करताना या घटनेबद्दल सांगितले. दोन महिन्यांपूर्वी दिल्लीच्या डीआरडीओ भवनात आयईडी (इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस) स्फोटके ठेवण्यात आली होती. अनेक सुरक्षा यंत्रणांनी प्रयत्न करूनही ही स्फोटके निकामी होत नव्हती. अखेर एनएसजीच्या बॉम्बविरोधी पथकाला पाचारण करण्यात आले आणि त्यांनी ही स्फोटके निकामी केली. सध्याच्या घडीला एनएसजीचे बॉम्बविरोधी पथक देशातील सर्वोत्तम पथक आहे. भविष्यातही एनएसजीचे हेच स्थान कायम राहील, असा विश्वास यावेळी आर. सी. तयाल यांनी व्यक्त केला.